डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी समाजकार्याला जोडणे महत्त्वाचे - डॉ. सुखदेव थोरात
By आनंद डेकाटे | Published: September 22, 2023 03:40 PM2023-09-22T15:40:30+5:302023-09-22T15:40:30+5:30
नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभागातर्फे 'शिक्षित व्हा संघर्ष करा आणि संघटित व्हा' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
नागपूर : भारतीय समाजातील जातीव्यवस्था आणि विविध विविधतेचा संदर्भ देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी समाजकार्याला जोडणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) माजी अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभागातर्फे 'शिक्षित व्हा संघर्ष करा आणि संघटित व्हा' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
डॉ. थोरात म्हणाले, जातिव्यवस्था सहानुभूतीच्या जमिनीचीही विभागणी करते. प्रत्येक जण आपापल्या वर्गासाठी काम करत आहे. त्यामुळे समाजकार्याच्या अभ्यासात वैविधतेचे पात्र आणणे गरजेचे आहे. समाजकार्य अभ्यासक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जोडून पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम तयार करता येईल. अभ्यासक्रमाला विचारधारेशी जोडल्यास सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे करण्याची प्रेरणा मिळेल. अनेक संस्थांमध्ये सामाजिक कार्याचे प्रशिक्षण दिले जाते. काहींनी सामाजिक कार्याचे अभ्यासक्रमाही सुरू केले आहेत. यावरून समाजात काय घडते आहे हे समजू शकते. प्रश्न सोडविण्यासाठी विचारधारा नसेल तर प्रश्न सुटणार नाहीत. फक्त समाजकार्य होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर भुवनेश्वर (ओरिसा) येथील एनआयएसडब्ल्यूएएसएस च्या प्राध्यापिका डॉ. शश्मी नायक, विद्यापीठाचे मानव्य विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले उपस्थित होते. संचालन डॉ. सरोज डांगे यांनी केले तर आभार प्रा. प्रीती वानखेडे यांनी मानले.