मेडिकल प्रवेश घोटाळ्यातील आरोपी डॉ. लोकप्रिय साखरे यांना हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 12:39 PM2022-04-15T12:39:38+5:302022-04-15T12:45:36+5:30

डॉ. साखरे नागपुरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथे सहायक प्राध्यापक आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मकोका कारवाईचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती.

dr. lokpriya sakhare accused in medical scam appeal of cancellation mcoca rejected by high court | मेडिकल प्रवेश घोटाळ्यातील आरोपी डॉ. लोकप्रिय साखरे यांना हायकोर्टाचा दणका

मेडिकल प्रवेश घोटाळ्यातील आरोपी डॉ. लोकप्रिय साखरे यांना हायकोर्टाचा दणका

googlenewsNext
ठळक मुद्देमकोका कारवाईचा आदेश रद्द करण्यास नकार

नागपूर : संपूर्ण राज्यामध्ये जाळे पसरले असलेल्या खळबळजनक वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश घोटाळ्यातील आरोपी डॉ. लोकप्रिय उद्धव साखरे यांना जोरदार दणका बसला आहे. त्यांच्यावरील मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गतची कारवाई रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.

डॉ. साखरे नागपुरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथे सहायक प्राध्यापक आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मकोका कारवाईचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. हा घोटाळा करणाऱ्या संघटित गुन्हेगारांशी काहीच संबंध नाही, असा दावा त्यांनी केला होता. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी रेकॉर्डवरील पुरावे विचारात घेता साखरे यांची याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली.

सीताबर्डी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश पालवे यांनी सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करून घोटाळ्याच्या तपासादरम्यान साखरे यांच्याविरुद्ध आढळून आलेल्या ठोस पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. साखरे, हा घोटाळा करणाऱ्या टोळीचा म्होरक्या चंद्रशेखर आत्राम याच्यासोबत व्हॉटसॲपवर सतत संपर्कात होते. त्यांच्यामधील संवादाचे स्क्रीनशॉट उपलब्ध आहेत, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाने प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर सध्याच्या परिस्थितीत साखरे यांचा संघटित गुन्हेगारांशी संबंध दिसून येतो, असे निरीक्षण नोंदविले, तसेच साखरे यांची याचिका या गंभीर गुन्ह्याच्या तपासामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे ताशेरेही ओढले.

मकोकाला पोलीस महासंचालकांची परवानगी

साखरे व इतर आरोपींविरुद्ध मकोकातील कलम ३(१)(२), ३(२), ३(४) व ४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस महासंचालकांना प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला २५ जानेवारी २०२२ रोजी मंजुरी देण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

४१ लाख रुपयांनी लुबाडल्याची तक्रार

घोटाळ्यातील आरोपींनी पुणे येथील डॉ. शिल्पा ढोकळे यांना ४१ लाख रुपयांनी लुबाडल्याची तक्रार आहे. आरोपींनी ढोकळे यांच्या मुलीला मेडिकलमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्यासाठी ही रक्कम घेतली होती. त्यानंतर आरोपींनी मुलीला प्रवेश मिळवून दिला नाही व रक्कमही परत केली नाही.

त्या पालकांना सहज फसवतात

अनेक पालक त्यांच्या अपत्यांना वैद्यकीय शिक्षण व अन्य विविध प्रतिष्ठित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी धडपड करीत असतात. याकरिता काहीही करण्याची पालकांची तयारी असते. समाजात सक्रिय समाजकंटक अशा पालकांना हेरून त्यांची सहज फसवणूक करतात, असे मतही न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित

साखरे यांनी गेल्यावर्षी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून, तो अर्ज अद्याप प्रलंबित आहे. न्यायालयाने २ नोव्हेंबर २०२१ रोजी साखरे यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही. या अर्जावर येत्या १९ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Web Title: dr. lokpriya sakhare accused in medical scam appeal of cancellation mcoca rejected by high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.