वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्याशी कुणाचे लागेबांधे ? डॉ. नीलम गोऱ्हेंचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 10:56 AM2022-01-17T10:56:41+5:302022-01-17T11:02:00+5:30
डॉ. कदम यांना इंजेक्शनची रसद कोणी पुरविली आणि त्यांचे कोणाशी लागेबांधे आहेत ते पुढे आले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली.
नागपूर : आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या डॉ. कदम यांना इंजेक्शनची रसद कोणी पुरविली आणि त्यांचे कोणाशी लागेबांधे आहेत ते पुढे आले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. गोऱ्हे यांनी या संबंधाने समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करून आर्वी येथील प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.
‘लोकमत’ने या खळबळजनक प्रकरणातील पापाचे खोदकाम केल्यानंतर गोऱ्हे यांनी गृहमंत्री वळसे-पाटील यांची भेट घेतली. त्यासंबंधातील माहिती त्यांना देताना त्या म्हणतात की, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट आणि केंद्र सरकारने केलेल्या बदलानुसार, ज्या महिलांना गर्भधारणा होऊन तीन महिने उलटून गेले; परंतु गर्भपात करणे आवश्यक आहे, अशा केसेसच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय समिती अपेक्षित आहे. वर्ध्यात ती समिती होती; परंतु पोस्कोच्या केसेस आल्यावर मुली गर्भवती असतील तर काय करावे, याबाबत निर्णय घेण्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांना एकत्रित बैठक घ्यायला हवी. या बैठकीतून अशा केसेसबाबत संबंधित समितीला मार्गदर्शक सूचना होणे आवश्यक आहे.
गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याशी आपण चर्चा करून गर्भपाताच्या संदर्भातील इंजेक्शनची रसद मिळत असताना त्याकडे कानाडोळा झाला का, तसेच या प्रकरणात कुणाचे लागेबांधे आहेत, ते समोर यावे अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची निर्दोष पद्धतीने चार्जशीट तयार व्हावी, अशी अपेक्षाही गृहमंत्र्यांकडे व्यक्त केली असून, सर्व काही तसेच होईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिल्याचे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.