डॉ. समीर पालतेवार यांना अंतरिम अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:08 AM2021-03-18T04:08:41+5:302021-03-18T04:08:41+5:30
नागपूर : मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालन करणाऱ्या व्हीआरजी हेल्थ केअर कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी वरिष्ठ ...
नागपूर : मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालन करणाऱ्या व्हीआरजी हेल्थ केअर कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. समीर नारायण पालतेवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी आर्थिक हेराफेरी प्रकरणामध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून ३१ मार्चपर्यंत उत्तर व केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कंपनीचे भागधारक गणेश चक्करवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. पालतेवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९ ४०६, ४६५, ४६७, २६८, ४७१ व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी)अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पालतेवार यांनी संगणकीय यंत्रणेमध्ये कमी रकमेची बिले दाखवून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा चक्करवार यांचा आरोप आहे. यासाठी त्यांनी तीन रुग्णांच्या बिलांचे उदाहरण दिले आहे. हा घोटाळा यापेक्षा मोठा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात गेल्या १५ मार्च रोजी सत्र न्यायालयाने पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खारीज केला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पालतेवार यांच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. अविनाश गुप्ता व ॲड. आकाश गुप्ता यांनी कामकाज पाहिले.
-------------
गणेश चक्करवार यांचा अर्ज मंजूर
फिर्यादी गणेश चक्करवार यांनी या प्रकरणात वकिलामार्फत सरकार पक्षाला सहाय्य करण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. चक्करवारतर्फे ॲड. श्याम देवानी यांनी बाजू मांडली.