व्हेंटिलेटरअभावी १७ वर्षीय मुलीच्या मृत्यूचा डॉ. सुधीर गुप्तांवर ठपका; अधिष्ठातापदाचा कार्यभार काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 12:10 PM2022-10-01T12:10:02+5:302022-10-01T12:19:25+5:30
सहायक प्राध्यापकावरही विभागीय चौकशीचे आदेश
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) व्हेंटिलेटरअभावी १७ वर्षीय युवतीचा मृत्यू प्रकरणात बेजबाबदारपणा झाल्याचा डॉ. सुधीर गुप्ता यांच्यावर ठपका ठेवत त्यांच्याकडून अधिष्ठातापदाचा कार्यभार काढण्यात आला. त्यांच्यासह मेडिसीन विभागातील एका सहायक प्राध्यापकाचे विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले.
मेडिकलमध्ये २२१ व्हेंटिलेटर असताना १७ वर्षीय वैष्णवी हिला २४ तास उलटूनही व्हेंटिलेटर मिळाले नाही. ‘अंबू बॅग’वरच तिने शेवटचा श्वास घेतला. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरल्याने मेडिकलने चौकशी समिती स्थापन केली. परंतु समितीच्या अहवालावर वैद्यकीय शिक्षण विभाग समाधानी नसल्याने त्यांनी नागपूर बाहेरील मेडिकल कॉलेजच्या तीन सदस्यांच्या समितीकडून चौकशी केली. या दोन्ही समितीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला. यामुळे सर्वांचे लक्ष कारवाईकडे लागले होते.
वैष्णवीच्या मृत्यूच्या १५ दिवसानंतर अखेर शुक्रवारी दुपारी शासनाचे तीन पत्र मेडिकलला धडकताच खळबळ उडाली. यात महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी अनिल चौरे यांचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबईला पाठविण्यात आलेल्या पत्रात अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्यावर बेजबाबदार वर्तणुकीचा ठपका ठेवला. सोबतच औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. हरीश सपकाळ यांनी नागरी सेवा (वर्तणूक) तरतुदीचा भंग केला म्हणून दोघांवरही विभागीय चौकशीविषयक कार्यवाही सुरू करण्याबाबतचे आदेश देण्यात आले.
-अधिष्ठातापदाचा कार्यभार काढून टाकण्यामागे प्रशासकीय कारण
डॉ. गुप्ता यांच्या विरोधात विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्तांकडे सादर केला. त्यांनी शासनाकडे सादर केलेल्या या अहवालाच्या आधारे डॉ. गुप्ता यांच्याकडून प्रशासकीय कारणास्तव मेडिकलचा अधिष्ठातापदाचा कार्यभार काढून घेण्यात आल्याचे महाराष्ट्र शासनाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांचे पत्रही आज शुक्रवारी दुपारी मेडिकलला प्राप्त झाले. त्यांच्या नवीन पदस्थापनेबाबत स्वतंत्ररित्या निर्णय घेण्यात येईल असेही पत्रात स्पष्ट केले.
-डॉ. राज गजभिये यांच्याकडे अधिष्ठातापद
डॉ. गुप्ता यांच्याकडून तडकाफडकी अधिष्ठातापदाचा कार्यभार काढून टाकण्यात आल्याने त्या पदावर मेडिकलच्या शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन केंद्र सेवा ‘गट-अ’ मधील अधिष्ठाता पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही डॉ. गजभिये यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्याचे पत्र दिले.
-घटनाक्रम
:: १६ सप्टेंबर, व्हेंटिलेटरअभावी १७ वर्षीय वैष्णवी राजू बागेश्वर हिचा ‘अंबू बॅग’वर मृत्यू
:: १७ सप्टेंबर, या प्रकरणाची मेडिकलच्याच सदस्यांकडून चौकशी
:: १८ सप्टेंबर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांची मेडिकलला भेट
:: २२ सप्टेंबर, वैद्यकीय शिक्षण विभागाने नागपूर बाहेरील तीन सदस्यांकडून प्रकरणाची चौकशी
:: २४ सप्टेंबर, दोन्ही समितीचे अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर
:: ३० सप्टेंबर, बेजबाबदारपणाचा डॉ. सुधीर गुप्तांवर ठपका, अधिष्ठातापदाचा कार्यभारही काढला
:: ३० सप्टेंबर, वॉर्डाची जबाबदारी असलेल्या सहायक प्राध्यापकाची विभागीय चौकशीचे आदेश