डॉ. सुषमानेच केली पती व मुलांची हत्या; चार महिन्यानंतर खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 10:46 AM2020-12-10T10:46:48+5:302020-12-10T10:47:11+5:30
Nagpur News crime कोराडीतील ओमनगर येथे चार महिन्यापूर्वी राणे दाम्पत्य व दोन मुलांचा रहस्य मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडीतील ओमनगर येथे चार महिन्यापूर्वी राणे दाम्पत्य व दोन मुलांचा रहस्य मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पत्नी डॉ. सुषमा राणे यांनीच पती व मुलांना विष देऊन हत्या केली व नंतर आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. सुषमा हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वाद, पतीचा शंकेखोर स्वभाव आणि दारूचे व्यसन यामुळे सुषमाने हे टोकाचे पाऊल उचलले होते, अशी माहिती झोन - ५ चे डीसीपी नीलोत्पल यांनी बुधवारी दिली.
गेल्या १८ ऑगस्ट रोजी दुपारी खासगी महाविद्यालयातील प्राध्यापक धीरज राणे, त्यांची पत्नी डॉ. सुषमा, मुलगा ध्रुव व मुलगी हे त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले होते. तेव्हा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. धीरज आणि मुले बिछान्यावर मृत पडली होती तर सुषमाने गळफास घेतला होता. पोलिसांना घटनास्थळावरून ऍनेस्थेशिया देण्यासाठी वापरण्यात येणारे औषध आणि सिरिंज सापडले हाेते. धीरज आणि मुलांच्या उजव्या हातावर इंजेक्शन दिल्याचे निशाणसुद्धा आढळून आले होते. त्यामुळे तिघांनाही इंजेक्शन दिल्यानंतर सुषमा यांनी स्वत: आत्महत्या केल्याचे दिसून येत होते.
सुषमा ही धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर होती. घटनेच्या दिवशी ती मुलीसोबत नेस्थेशियासाठी वापरण्यात येणारे औषध घेण्यासाठी रुग्णालयात गेली होती. नर्सला कुत्री रात्रभर भुंकत असल्याचे सांगून त्यांना झोपविण्यासाठी औषध आणि सिरिंज मागितली होती. सुषमाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टवरून तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु धीरज व मुलांच्या रिपोर्टलाा रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले होते. ७ डिसेंबर रोजी रासायनिक विश्लेषणाच्या रिपोर्टवरून धीरज व मुलांचा मृत्यू विष दिल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. या आधारावर कोराडी पोलिसांनी बुधवारी सुषमाविरुद्ध पती व दोन मुलांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला.
मुलगा होता ज्युडो कराटे चॅम्पियन
सुषमा ही आपल्या वैवाहिक जीवनात इतकी हताश झाली होती की, आपला गुणवंत मुलगा ध्रुव याचा जीव घेतानाही तिने मागेपुढे पाहिले नाही. ध्रुव हा ज्युडो कराटे चॅम्पियन होता. तो काही दिवसापूर्वीच लंडन येथून एक स्पर्धा जिंकून आला होता. त्याचे भविष्य अतिशय उज्ज्वल हाेते. तो अभ्यासातही अतिशय हुशार होता. हे प्रकरण उघडकीस आणण्यात डीसीपी नीलोत्पल यांची महत्त्वाची भूमिका राहिली. पोलिसांना सुषमाच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक पुरावे व चौकशी अहवाल गोळा करावे लागले.