"डॉ. मनमोहनसिंगांच्या नेतृत्त्वात देशात मुकं-बहिरं सरकार होतं"; गडकरींकडून मोदींचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:18 PM2024-03-05T14:18:46+5:302024-03-05T14:58:46+5:30

नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

"Dr. Under the leadership of Manmohan Singh, there was a deaf-mute government in the country. Nitin Gadkari appreciate narendra modi | "डॉ. मनमोहनसिंगांच्या नेतृत्त्वात देशात मुकं-बहिरं सरकार होतं"; गडकरींकडून मोदींचं कौतुक

"डॉ. मनमोहनसिंगांच्या नेतृत्त्वात देशात मुकं-बहिरं सरकार होतं"; गडकरींकडून मोदींचं कौतुक

नागपूर - राज्यात नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून महायुती सरकार आणि भाजपाकडून तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. या कार्यक्रमात राज्य सरकारच्या आणि मोदी सरकारने केलेल्या विविध विकासकामांची माहिती देत सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जात असल्याचे भाजपा नेते सांगत आहेत. बारामती येथील नमो रोजगार मेळाव्यानंतर आता नागपूर येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात बोलताना नितीन गडकरी यांनी, देशात २०१४ साली मुकं आणि बहिरं सरकार होतं, असे म्हणत मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलंय. 

नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये, ते देशातील ग्रामीण व आदिवासी भागात अद्यापही विकास करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी मोदी सरकारवर नितीन गडकरी टीका करत असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, या व्हिडिओवर स्वत: गडकरी यांनीही खुलासा केला, तसेच हा व्हिडिओ चुकीच्या आणि अर्धवट पद्धतीने व्हायरल केल्याचं गडकरी यांनी म्हटलं होतं. आता, नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या १० वर्षातील कामाचं मोठं कौतुक केलं आहे. 

देशात मोदी सरकार येण्यापूर्वी २०१४ मध्ये देश कर्जात बुडाला होता, दिल्लीत अशी सरकार होती, ज्यांना डोळे होते पण दिसत नव्हतं. कान होते पण ऐकू येत नव्हतं. ज्यांना तोंड होतं पण बोलता येत नव्हतं. दिल्लीत मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात असं मुकं-बहिरं सरकार होतं, असे म्हणत नितीन गडकरी यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर आणि मनमोहनसिंग यांच्यावर हल्लाबोल केला. 

सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशातील जनतेनं भाजपला संधी दिली. आता, मोदी सरकारच्या नेतृत्वात जवळपास १० वर्षे पूर्ण होत आहेत. काँग्रेसचे ६५ वर्षे आणि भाजपाने मोदींच्या नेतृत्त्वात केलेल्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची तुलना करा. किती पोर्ट बनले आहेत, किती एअरपोर्ट बनले आहेत, किती महामार्ग बनले आहेत, किती रेल्वे स्टेशन बनले आहेत. प्रत्येक ठिकाणी मोठा बदल झालेला आपणास दिसून येतोय. 

एक राजकीय नेता म्हणून मी हे बोलत नाही. तर, निती आयोगाच्या अहवालातून पुढे आलेल्या माहितीनुसार, आपल्या देशातील २५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या दारिद्र रेषेखाली होती, ती आज वर आली आहे. फूटपाथवर दुकान चालवणाऱ्या ८० लाख लोकांना बँकांनी कर्ज दिले आहे. तरुणाईला कर्ज मिळत आहे. नागपुरात जेव्हा आम्ही मिहान प्रकल्प सुरू केला, तेव्हा शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी विरोध केला. हा प्रकल्प होऊ नये म्हणून आंदोलन करण्यात आले. पण, आज ह्या प्रकल्पात जगभरातून विविध कंपन्या आल्या आहेत. विदर्भातील ६८ हजार लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाल्याचेही गडकरी यांनी सांगितले. 

गाव, गरीब, मजूर, शेतकरी यांचं कल्याण होण्यासाठी मोदींच्या नेतृत्त्वात आमचं सरकार काम करत आहे. देशात चांगली महाविद्यालये होतील, शाळा उभारतील, चांगले हॉस्पीटल उभारले जातील, चांगले रस्ते होतील, असे म्हणत नितीन गडकरींनी विकासकामांवरही भाष्य केले. 
 

Web Title: "Dr. Under the leadership of Manmohan Singh, there was a deaf-mute government in the country. Nitin Gadkari appreciate narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.