डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मिळणार मुदतवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:12 AM2018-01-24T00:12:35+5:302018-01-24T00:13:57+5:30

Dr. Ved Prakash Mishra gets extension? | डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मिळणार मुदतवाढ?

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मिळणार मुदतवाढ?

googlenewsNext
ठळक मुद्देस्नातकोत्तर पदविका वाङ्मय चौर्यकर्मप्रकरण : आज परीक्षा मंडळाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात डॉ. मिश्रा यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिले नसून, यासाठी त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार असून त्यानंतरच फैसला की मुदतवाढ, हे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.
डॉ. मिश्रा यांनी १९८७ साली गांधी विचारधारा अभ्यासक्रमात शोधप्रबंध सादर करताना गैरप्रकार केल्याचा आरोप तत्कालीन विधिसभा सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी लावला होता. हा आरोप १९९१ मध्ये लावण्यात आला व तत्कालीन कुलगुरूंनी न्यायिक चौकशीचे आदेश दिले होते. न्या. रत्नपारखी समितीने १९९२ साली काही तथ्य विद्यापीठासमोर मांडले. त्यानुसार डॉ. मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर. व्ही. राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती. त्यानंतर ९ आॅक्टोबर १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत रत्नपारखी समितीच्या अहवालाला मान्य करण्यात आले. डॉ. मिश्रा यांनी या निर्णयाला दिवाणी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यायालयाने हा दावा खारीज केला होता. १९९२ च्या निर्णयानुसार आतापर्यंत डॉ. मिश्रा यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती.
यासंदर्भात परीक्षा मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली होती व डॉ. मिश्रा यांना नोटीस बजाविण्यात आली. स्पष्टीकरण देण्याची अखेरची मुदत ५ जानेवारी होती. मात्र डॉ. मिश्रा यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतरदेखील मुदतवाढ देण्यात आली असली तरी अद्यापपर्यंत त्यांच्याकडून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दिवाणी न्यायालयात त्यांनी जुनी याचिका पुनरुज्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, बुधवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार आहे. विद्यापीठ त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार पुरेसा वेळ देईल. परीक्षा मंडळाच्या बैठकीत १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येऊ शकते, असे संकेत कुलगुरूंनी मागेच दिले होते, हे विशेष.

 

Web Title: Dr. Ved Prakash Mishra gets extension?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.