डॉ. आंबेडकर रुग्णालयाचा विकास कधी ?
By admin | Published: December 21, 2015 03:09 AM2015-12-21T03:09:11+5:302015-12-21T03:09:11+5:30
कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी होत आहे.
नागपूर : कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी होत आहे. ‘एम्स’सोबतच या रुग्णालयाचा विकास होईल अशी घोषणाही झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात १० वर्षे होऊनही हे रुग्णालय केवळ बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाची रुग्णसंख्या दरवर्षी कमी होऊन सध्या ती ४०० वर आली आहे.
३ मार्च २०१४ रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्था स्थापन करण्यावर निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधीही मंजूर करण्यात आला. पाच वर्षांमध्ये हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार होता.
५६८ खाटांचे हे रुग्णालय होणार होते. रु ग्णालयाकडे सध्या २९ हजार ७९ चौरस मीटरची जागा उपलब्ध आहे. यातील काही जागेवर बांधकाम होणार होते. डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी १०७३ पदे भरण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यात प्राध्यापकांची २१, सहयोगी प्राध्यापकांची २३, सहायक प्राध्यापकांची ३६, वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११, परिसेविकांची ५०, अधिपरिचारिकांची ३४३ तर वर्ग ३ व ४ ची पदेही भरली जाणार होती. परंतु गेल्या दीड वर्षात यावर काहीच झालेच नाही.
उलट रुग्णालयात मोजकेच उपचार तेही ठाराविक वेळेसाठीच होत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टर, तंत्रज्ञ रजेवर गेल्यास रुग्णसेवा प्रभावित
रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र क्ष-किरण, पॅथालॉजी व सोनोग्राफी विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. तोकड्या मनुष्यबळामुळे यातील एक जरी रजेवर गेल्यास रुग्णसेवा प्रभावित होते.
औषध व सोयींचा तुटवडा
मेयोच्या देखरेखेखाली हे रुग्णालय सुरू असले तरी डॉक्टरांची चमू ही आरोग्य विभागाची आहे. मेयोत आधीच औषधांचा तुटवडा असल्याने या रुग्णालयासाठी औषधे उपलब्ध करून देणे प्रशासनाला अडचणीचे जात आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयात ईसीजी मशीन नाही. पॅथालॉजीमध्ये मोजक्याच चाचण्या होतात. क्ष-किरण विभागात एक्स-रेचा तुटवडा राहत असल्याने रुग्णांना मेयोत पाठविले जात असल्याने या रुग्णालयाला घेऊन नागरिकांमध्ये रोष आहे. जिल्हा रुग्णालय झाल्यास या सर्व अडचणी सुटण्याची शक्यता आहे.