डॉ. यशवंत मनोहर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार; आंबेडकराईट मुव्हमेंट वाड्मयीन पुरस्कारांची घोषणा
By आनंद डेकाटे | Published: February 9, 2024 08:03 PM2024-02-09T20:03:29+5:302024-02-09T20:04:48+5:30
डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेने आणइ प्रगल्भ चिंतनाने आंबेडकरवादी मराठी साहित्याला समाजभिमुख केले.
नागपूर: सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाच्या ध्यास घेऊन दलित, शोषित, पीडित आणि वंचित माणसांचे जीवन आपल्या साहित्यकृतीतून अभिव्यक्त करणाऱ्या आंबेडकरनिष्ठ साहित्यिकांना आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर या संस्थेच्यावतीने दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर वाड्मयीन पुरस्कार दिले जातात. यंदा संस्थेच्या पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. आंबेडकरवादाचे निष्ठावंत भाष्यकार, विचारवंत आणि ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर यांना यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दादाकांत धनविजय आणि सचिव डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी दिली.
डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या उत्तुंग प्रतिभेने आणइ प्रगल्भ चिंतनाने आंबेडकरवादी मराठी साहित्याला समाजभिमुख केले. कविता, कादंबरी, वैचारिक समीक्षा असे विपूल लेखन डॉ. यशवंत मनोहर यांनी केले आहे. त्यांचा गौरव म्हणजे एकुणच आंबेडकरी साहित्य चळवळीचा सन्मान असल्याचे संस्थेने म्हटले आहे. यासोबतच राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये वसंत मून वैचारिक-संशोधन पुरस्कार मिलिंद किर्ती (नागपूर) यांच्या सहमतीची हुकुमशाही या पुस्तकाला, बाबुराव बागूल कादंबरी पुरस्कार, उल्हास निकम (मुक्ताईनगर) यांच्या अंगुलीमाल या कादंबरीस, दया पवार आआत्मकथन पुरस्कार राजू बाविस्कर (जळगाव) यांच्या काळ्यानिळ्या रेषा या आत्मकथनास, नामदेस ढसाळ काव्यपुरस्कार प्रशांत वंजारे (यवतमाळ) यांच्या आम्ही युद्धखोर आहोत या कवितासंग्रहास, अष्वघोष नाट्यपुरस्कार प्रतिमा इंगोले (पुणे) यांच्या तारूण्याची बखरया नाटकास आणि डॉ. भगवानदास हिंदी दलित साहित्य पुरस्कार कर्मशील भारती (दिल्ली) यांच्या क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले या पुस्तकास जाहीर झाला आहे. दहा हजार रूपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. तर प्रत्येकी पाच हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ९ मार्च रोजी विदर्भ हिंदी मोरभवन येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील.