दरोड्याचा कट रायपूरच्या कारागृहात ?

By admin | Published: October 2, 2016 02:43 AM2016-10-02T02:43:01+5:302016-10-02T02:43:01+5:30

मणप्पुरम गोल्ड फायनान्स लिमिटेड कंपनीत घालण्यात आलेल्या दरोड्याचा कट रायपूरच्या कारागृहात शिजला होता,

Draft cut in Raipur jail? | दरोड्याचा कट रायपूरच्या कारागृहात ?

दरोड्याचा कट रायपूरच्या कारागृहात ?

Next

मणप्पुरम गोल्ड प्रकरणाचा धागा गवसला : ‘बिहारी टोळी’चा शोध
नरेश डोंगरे नागपूर
मणप्पुरम गोल्ड फायनान्स लिमिटेड कंपनीत घालण्यात आलेल्या दरोड्याचा कट रायपूरच्या कारागृहात शिजला होता, अशी खळबळजनक माहितीवजा चर्चा संबंधित वर्तुळातून पुढे आली आहे. दरोडेखोरांनी रायपूर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर लगेच दरोड्याचा कट पूर्णत्वास नेला, अशीही विश्वसनीय माहिती खास सूत्रांकडून पुढे आली आहे. पोलीस अधिकारी यासंदर्भात बोलायला तयार नसले तरी या माहितीच्या आधारेच दरोडेखोरांच्या मुसक्या बांधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती आहे.
मणप्पुरम गोल्ड फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या दरोडा घालण्याच्या घटनेला ७२ तासांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, अद्याप एकही दरोडेखोर हाती लागला नाही.

पोलिसांची १६ पथके परराज्यात
नागपूर : दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी पोलिसांची १६ पथके परराज्यात तर, अन्य काही पथके उपराजधानीत परिश्रम घेत आहेत. दरोडेखोरांना पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निरंतर संपर्कात आहेत.मणप्पूरमच्या कार्यालयातील सीसीटीव्हीत दरोडेखोर कैद झाले. त्यांचे आणि रायपूरच्या कारागृहातून काही दिवसांपूर्वीच बाहेर पडलेल्या गुन्हेगारांचे छायाचित्र मिळतेजुळते आहे. या गुन्हेगारांमध्ये काही गुन्हेगार बिहारचे असून, एवढा मोठा (३१ किलो सोने) नसला तरी त्यांनी असाच लुटमारीचा गुन्हा यापूर्वी केला होता. छत्तीसगड पोलिसांनी त्यांना पकडून कारागृहात डांबले होते. या कारागृहात अन्य राज्यातील काही गुन्हेगार होते. तेथे मणप्पुरम गोल्डच्या नागपूर शाखेतील सुरक्षा व्यवस्था कशी तकलादू आहे, याची माहिती गुन्हेगारांच्या टोळीत चर्चेला आली होती अन् त्याचमुळे रायपूर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ‘बिहारी गँग’ने डाव साधल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे. शहर पोलिसांनी या गुन्हेगारांची छायाचित्रे छत्तीसगड पोलीस प्रशासनाकडून मागवून घेत मणप्पूरमच्या सीसीटीव्हीत कैद झालेल्यांशी ती जुळवून पाहिली. या गुन्हेगारांची आणि ‘त्या’ गुन्हेगारांपैकी काहींची छायाचित्रे तंतोतंत जुळत असल्याचीही माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, छत्तीसगडमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे रायपूर कारागृहातून सुटलेल्या ‘त्या’ गुन्हेगारांची बिहारमध्ये शोधाशोध केली असता ते ८-१५ दिवसांपासून घरून (गावातून) बेपत्ता असल्याचे समजते. यामुळे ‘बिहारी टोळी’नेच हा दरोडा घातल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली आहे. मात्र, जोपर्यंत संशयित हाती लागत नाही, तोपर्यंत या संशयाला अर्थ नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे मत आहे.


दिल्ली-जबलपूरचेही कनेक्शन ?
देशातील विविध भागात धाडसी घरफोड्या करणाऱ्या दिल्लीतील एका टोळीने मणप्पुरमच्या याच कार्यालयात सहा महिन्यांपूर्वी चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, अलार्म वाजल्यामुळे त्यावेळी दिल्लीचे चोरटे पळून गेले. नंतर ही टोळी नागपूर पोलिसांनी पकडली होती. या टोळीने उपराजधानीतील अनेक धाडसी घरफोड्यांची कबुली देतानाच मणप्पुरमच्या कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचीही कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मणप्पुरम प्रशासनाला सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले अन् नागपूरच्या आजवरच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याची घटना घडली. दरम्यान, या दरोड्यातील संशयित बिहारी टोळीला ‘नालंदा टोळी’ म्हणूनही गुन्हेगारी वर्तुळात ओळखले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्यासाठी ‘नालंदा’ जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातही जाळे विणण्यात आले आहे. या टोळीसोबत जबलपूरच्या कुख्यात पहेलवान टोळीचे कनेक्शन असल्याची चर्चा असून, नागपुरात पकडण्यात आलेल्या दिल्लीच्या टोळीचे काही संबंध आहेत काय, त्याचाही शोध घेतला जात आहे.

Web Title: Draft cut in Raipur jail?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.