ड्रॅगन पॅलेस टेम्पल बुद्धिस्ट सर्किटशी जोडले जाणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 07:45 PM2021-10-15T19:45:49+5:302021-10-15T19:46:06+5:30
अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण
नागपूर : कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. हे महत्वाचे बौद्ध स्थान आहे, त्यामुळे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी बुद्धिस्ट सर्किटशी कामठी जोडले गेले असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन महोत्सव आणि येथील अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी बोलत होते. याप्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार व लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, थायलंड येथील भन्ते निकुंज, भाजपचे प्रदेश महासचिव व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष आणि केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य ऍड. सुलेखा कुंभारे उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गौतम बुद्ध यांनी विश्वकल्याणचा मार्ग दिला. त्यांच्या मार्गानेच देशातील सर्व प्रश्न सुटतील. बौद्ध अनुयासाठी महत्वाचे असलेले 9 स्थळे बुद्धिस्ट सर्किट मध्ये समाविष्ट करण्याचा प्रकल्प केंद्र शासनाने राबविला आहे. त्या साठी एकसूत्री रोडकरिता 21 हजार कोटी रुपये मंजूर केले असून त्याचे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सर्किट पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी दिला. कोणताही व्यक्ती जातीने मोठा होत नसतो, त्याने केलेले कार्य, कर्तृत्व महत्वाचे असते. एकेकाळी कामठी हे बिडी व्यवसायाकरिता नावाजलेले होते. दादासाहेब कुंभारे यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. आता बीडी व्यवसाय संपला व ऍड. सुलेखा कुंभारे यांनी दादासाहेब कुंभारे व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र सुरू करून समाजातील गरीब ,शोषित यांना शिक्षण, आर्थिक रोजगार व उत्तम आरोग्य प्रदान करण्यासाठी कार्य चालविले आहे. अगरबत्ती प्रकल्पामुळे या भागातील 10 हजार महिलांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, राज्यात एका पक्षाला कमी केले तर लवकरच सत्ता परिवर्तन होऊन देवेंद्र फडणवीस पून्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. फडवणीस सरकारमध्ये राज्यात चांगले कार्य झाले. भाजप हा सर्व समाजाला घेऊन चालणारा हा एकमेव पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. विजय दर्डा म्हणाले, कामठीचे नाव दोन गोष्टीसाठी प्रख्यात आहे. कामठी एकेकाळी बिडी उद्योगासाठी प्रसिद्ध होते व दादासाहेब कुंभारे त्या चळवळीचे नेते होते. त्यांचा वारसा सांभाळत सुलेखा कुंभारे यांनी दलित समाजासाठी कार्य चालविले आहे. सोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पलची स्थापना करून कामठीचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले आहे. दीक्षाभूमी नागपूरला येणारा प्रत्येक अनुयायी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत असतो.
सुलेखा कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे नाव हजारो वर्ष अजरामर राहणार असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पर्वावर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमा दरम्यान ड्रॅगन पॅलेस व दीक्षाभूमी यांच्या संयुक्त आढावा घेत असतात. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेतील विजेते आयुष प्रभाकर वाहने, अंशुल अरविंद वाघमारे ,अश्विता अविनाश दहाड यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विनोद जुमले यांनी केले. मुख्याध्यापिका अशलेषा मेश्राम यांनी आभार मानले. फडणवीस म्हणाले, जगावर शस्त्राने नाही तर धर्माने विजय प्राप्त करणारा बुद्धाचा धर्म आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या माध्यमातून बुद्धाचा विचार जगभरात पोहचविण्याचे कार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.