दक्षिण नागपुरातील ड्रेनेज लाईनमुळे विहिरींचे पाणी दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:08 AM2021-02-25T04:08:49+5:302021-02-25T04:08:49+5:30
नागपूर - दक्षिण नागपुरातील अयोध्यानगर ते नंदनवन भागात ड्रेनेज लाईनमुळे विहिरींचे पाणी दूषित होत आहे. अनेकांनी नाईलाजाने विहिरी बुजविल्या ...
नागपूर - दक्षिण नागपुरातील अयोध्यानगर ते नंदनवन भागात ड्रेनेज लाईनमुळे विहिरींचे पाणी दूषित होत आहे. अनेकांनी नाईलाजाने विहिरी बुजविल्या असून, या भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप युवा चेतना मंचतर्फे करण्यात आला आहे.
१९६० च्या कालावधीत केंद्र सरकारने दक्षिण नागपूर वस्तीचा विस्तार केला आणि तेव्हा रस्ते, वीज आणि आरोग्य या सुविधा करण्यात आल्या. १९६३ मध्ये या भागात अयोध्यानगर ते नंदनवन ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. या भागात पूर्वी शेती होती. त्यामुळे येथे काळी मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ९ इंचाचे सिमेंटचे पाईप टाकून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती. परंतु नंतर मोठ्या प्रमाणात या भागाचा विस्तार झाला आणि समस्यांना सुरुवात झाली. ड्रेनेज लाईन चोक होण्यास प्रारंभ झाला. कालांतराने ही ड्रेनेज लाईन हळूहळू क्षतिग्रस्त झाली आणि या भागातील विहिरी व पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले. विहिरीचे पाणी खराब झाल्यामुळे लोकांनी आपल्या विहिरी बुजविल्या. या परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन चोकअप होत राहतात. शिवाय कावीळसारखे आजारदेखील होतात. या भागात सिमेंट रोडचे काम पूर्ण होण्यापूर्वी येथे मोठी ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी, अशी मागणी युवा चेतना मंचतर्फे करण्यात आली. मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश शिवाजीराव महाडिक यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी दत्ता शिर्के, राहुल बांबल, प्रवीण घरजाळे इत्यादी उपस्थित होते.