विषारी विळखा : गटाराचे पाणी थेट नदी, नाल्यात; भूगर्भातील पाणीही विषारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 12:25 PM2022-04-28T12:25:44+5:302022-04-28T12:35:41+5:30
हे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे भूगर्भातील जलसाठाही दूषित होत आहे.
गणेश हूड
नागपूर : उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातून निघणारे गटाराचे पाणी थेट नदी व नाल्यात सोडले जात आहे. नागनदी, पिवळी व पोहरा नदीत प्रक्रिया न करता १२७ ठिकाणी सिवरेज लाईन थेट सोडण्यात आल्या आहेत. यामुळे या तीन प्रमुख नद्यांसह २२७ नाले दूषित झाले आहेत. हे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे भूगर्भातील जलसाठाही दूषित होत आहे.
शहरातील सिवरेजची समस्या विचारात घेता २०११ ते २०४१ असा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. मात्र, महापालिकेने त्याची अंमलबजावणीच केलेली नाही. शहरातील सिवरेज लाईन ट्रंक लाईनला जोडलेल्या नाहीत. तसेच शहराच्या सर्व भागात ट्रक लाईनचे जाळे नाही. त्यामुळे सिवरेज लाईन नदी वा नाल्यात सोडण्यात आलेल्या आहेत.
३० टक्के सांडपाण्यावर प्रक्रियाच नाही
- नागपूर शहराची लोकसंख्या जवळपास ३५ लाख आहे. २०२६ मध्ये ती ४० लाखांवर जाईल, तर २०४१ मध्ये ती ६२.६८ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. सध्या नागपूर शहराला ६५८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. यातून ५२५ एमएलडी सांडपाणी निर्माण होते, तर ३८० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर १४५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. २०४१ मध्ये शहराला ११७६ एमएलडी पाणीपुरवठा करावा लागेल. यातूत ७५२.०३ एमएलडी सांडपाणी निर्माण होणार आहे.
२१०० किमी सिवरलाईनची गरज
- टोपोग्राफीनुसार शहरातील सिवरेजची उत्तर, मध्य व दक्षिण अशी तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. तीनही विभागातील सिवरेजचे जाळे ३५०० किलोमीटर आहे. सध्या शहरात १४७५ किलोमीटरचे जाळे आहे, तर २१०० किलोमीटरचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे.