रंगकर्मी राम म्हैसाळकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:24 AM2019-01-30T01:24:09+5:302019-01-30T01:25:00+5:30
संगीत नाटकांची समृद्धी विदर्भाच्या भूमीत रुजविणारे एकमेव रंगकर्मी डॉ. राम म्हैसाळकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमल, शुभदा देशपांडे व अरुंधती गिरणीकर या दोन मुली व मुलगा भवन व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ९ वाजता २८, हिंदुस्तान कॉलनी, वर्धा रोड या त्यांच्या निवासस्थानाहून निघेल व त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संगीत नाटकांची समृद्धी विदर्भाच्या भूमीत रुजविणारे एकमेव रंगकर्मी डॉ. राम म्हैसाळकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमल, शुभदा देशपांडे व अरुंधती गिरणीकर या दोन मुली व मुलगा भवन व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ९ वाजता २८, हिंदुस्तान कॉलनी, वर्धा रोड या त्यांच्या निवासस्थानाहून निघेल व त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मूळचे अचलपूर येथील रहिवासी डॉ. राम म्हैसाळकर हे व्यवसायाने डॉक्टर होते. मात्र वडिलांप्रमाणेच नाटकांची आवड त्यांना होती. स्वत: उत्तम गायक आणि संगीत नाटकांबद्दलची जाण असलेला हा कलावंत. त्या काळी संगीत नाटक बसविणे व ते सादर करणे हे परिश्रमाचे आणि खर्चाचेही काम होते. मात्र डॉ. म्हैसाळकर यांनी ‘नाट्यवलय’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून स्वखर्चाने संगीत नाटकांची मेजवानी वैदर्भीय प्रेक्षकांना दिली. या माध्यमातून संगीत सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ, स्वयंवर, शारदा, शाकुंतलम्, मत्स्यगंधा अशा लोकप्रिय अशा संगीत नाटकांचे प्रयोग राज्य व राज्याबाहेर सादर केले. १९५० ते १९८५-८६ पर्यंतचा काळ त्यांनी संगीत नाटकांनी गाजविला. संगीत नाटकांच्या माध्यमातून कल्याणी देशमुख, अनिरुद्ध देशपांडे, काका जोगळेकर असे मातब्बर गायक कलासृष्टीत निर्माण केले. परीक्षक, सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. ‘संगीत वहिनी’, ‘दूरचे दिवे’ या नाटकांसाठी त्यांनी प्रथम पुरस्कारही प्राप्त झाले होते. ‘थँक्यू मिस्टर ग्लॅड’, ‘बेइमान’ आदी नाटकांचे दिग्दर्शन तर ‘संत धीरवीर पुरुष पहा’ व ‘अत्तर’ या नाटकांचे लेखनही त्यांनी केले होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या सर्व कवितांचा भावानुवाद करणारे ते एकमेव अन्यभाषी भारतीय होते. ते रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते व संघाची प्रार्थना उत्तम पद्धतीने सादर करण्याचा त्यांचा लौकिक होता.
डॉ. राम म्हैसाळकर यांच्या निधनाने विदर्भाच्या भूमीतील संगीत नाटकांचा अध्वर्यू लोपल्याची भावना ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर आंबोणे यांनी, नाट्यवलय संस्थेमध्ये त्यांच्यासोबत काम केल्याचे सांगत संगीत नाटकांसाठी स्वत:ला वाहून घेतलेला मोठा कलावंत गमावल्याची संवेदना व्यक्त केली. ज्येष्ठ रंगकर्मी श्रद्धा तेलंग यांच्या ‘किचकवध’ या पदार्पणाच्या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. म्हैसाळकर यांनी केले होते. त्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्राची मोठी हानी झाल्याची संवेदना व्यक्त केली.