अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेची नाट्यस्पर्धा ‘ऑनलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:36 AM2020-04-01T11:36:30+5:302020-04-01T11:37:45+5:30
रंगकर्मींमधील ऊर्जा कायम राहावी या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने ‘ऑनलाईन’ नाट्यस्पर्धेची घोषणा केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे सर्वच कलावंत घरात कुलूपबंद झाले आहेत. नाटकाच्या तालमी थांबल्या आहेत, प्रयोग रद्द झाले, अनेक स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर १००वे नाट्य संमेलनही पुढे ढकलण्यात आले आहेत. अशात रंगकर्मींमधील ऊर्जा कायम राहावी या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने ‘ऑनलाईन’ नाट्यस्पर्धेची घोषणा केली आहे.
नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापन दिन सोहळा १४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असतो. यंदा हा सोहळा कोरोना संकटामुळेच स्थगित करण्यात आला आहे. मात्र, थांबेल तो रंगकर्मी कसला, या नात्याने नागपूर शाखेने ऑनलाईन नाट्यस्पर्धेची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे घरात कुलूपबंद अवस्थेत असलेल्या रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. ‘संकल्पना आमची आविष्कार तुमचा’ या कल्पनेंतर्गत घरी राहूनच नाट्यस्पर्धेत सहभागी होण्याची संधी रंगकर्मींना मिळाली आहे. याची टॅगलाईनच ‘घरबसल्या जोपासू... वारसा कलेचा’ अशी आहे. नाट्य परिषदेचे पदाधिकारी प्रफुल्ल फरकसे, नरेश गडेकर, संजय रहाटे, किशोर आयलवार यांनी ही संकल्पना सादर केली आहे. यात कलावंतांनी व्हिडिओद्वारे पाच ते सात मिनिटाच्या आपल्या सादरीकरणाचे चित्रिकरण करून पाठवायचे आहे. यात एकपात्री, नाट्यछटा आणि स्वगत रंगकर्मींना मोबाईलमध्ये चित्रिकरण करून पाठवता येणार आहे. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत १४ एप्रिल आहे. या स्पर्धेसाठी कुठलीही प्रवेश फी घेण्यात येणार नाही. हे चित्रीकरण घरातीलच असावे. ही स्पर्धा महाराष्ट्र स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. विजेता स्पर्धकास रोख पारितोषिके व स्मृतिचिन्ह तसेच सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येईल, अशी माहिती नरेश गडेकर, किशोर आयलवार, संजय रहाटे यांनी दिली आहे.