नाट्य परिषद : मध्यवर्तीसोबतच सर्व शाखांची निवडणूक होईल एकत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:54 PM2019-08-07T23:54:54+5:302019-08-07T23:55:56+5:30
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाकडून येत्या काळात मध्यवर्तीसोबतच परिषदेच्या सर्व शाखांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवरही वर्तमान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांचा प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून ‘एक देश, एक निवडणूक प्रक्रिया’ धोरण राबविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाकडून येत्या काळात मध्यवर्तीसोबतच परिषदेच्या सर्व शाखांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे.
नाट्य परिषदेच्या वर्तमान कार्यकारिणीचा कार्यकाळ गेल्याच महिन्यात संपला असून, ऑगस्टच्या उत्तरार्धात शाखेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात वर्तमान कार्यकारिणीची अखेरची बैठक पार पडली होती. या बैठकीत निवडणुकीचा आराखडा मध्यवर्तीकडे पाठविण्यात आला असून, १० ऑगस्टपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर शाखेप्रमाणेच, नाट्य परिषदेशी संलग्नित अन्य काही शाखांच्या निवडणुकाही याच वर्षात होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एका खासगी कार्यक्रमानिमित्त मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी बुधवारी नागपुरात होते. चर्चेत त्यांनी नाट्य परिषदेच्या सर्वच शाखांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतील, असले सूचक वक्तव्य केले. पुढच्याच महिन्यात नियामक मंडळाची बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
२०२३ पासून होतील एकत्र निवडणुका
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक २०१८मध्ये पार पडली. मोहन जोशी गटाला धोबीपछाड देत, प्रसाद कांबळी गटाने बाजी मारत नियामक मंडळावर कार्यकारिणी बसवली. या कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२३ मध्ये पूर्ण होत आहे. त्याअनुषंगाने, एकत्र निवडणुका घेण्याचा निर्णय २०२३ पासूनच अमलात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या वर्षात किंवा पुढच्या वर्षी होणाऱ्या काही शाखांच्या निवडणुकीत विजय मिळविणाºया कार्यकारिणीला २०२३ पर्यंतचाच काळ मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.