नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची निवडणूक झाली! पण कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:51 AM2020-02-18T11:51:57+5:302020-02-18T11:54:33+5:30
तब्बल १४ महिने नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेकडून नागपूरकर किंवा वैदर्भीय रंगकर्मींसाठी कुठलेच उपक्रम राबविले गेले नाही. नागपूर शाखेकडून ‘संमेलन टू संमेलन’ एवढेच काम करण्याचा निर्धार झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
प्रवीण खापरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची निवडणूक नुकतीच पार पडली. स्पर्धेत विरोधक कुठेच नसल्याने, बिनविरोध झालेल्या निवडणुकीत सदस्यांना औपचारिकरीत्या कार्यभार प्रदान करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेमुळे, एरवी पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीत कान खूपसून असणाऱ्या विरोधकांची चांगलीच गोची झाली आणि आता पुन्हा डोके वर काढत ‘निवडणूक झाली! पण कधी’ अशी ओरड करून स्वत:च्या पराभवावर स्पष्टीकरण देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
रंगकर्मींच्या एकोप्यासाठी स्थापन झालेली नाट्य परिषदेची नागपूर शाखा म्हणजे अंतर्गत हेवेदाव्यांचे माहेरघर झाले आहे. रंगकर्मींचा लाभ कमी आणि पदांचा मोह जास्त, या पलिकडे तरी नागपूर शाखेच्या राजकारणात काहीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर शाखेच्या गत कार्यकारिणीला तब्बल दोन वेळा हेडपास मिळाल्याने, राजकारणात ज्यादा रस घेणाऱ्या विरोधकांनी आकांडतांडव केले होते.
शाखेच्या कार्यकारिणीची मुदत १३ जानेवारी २०१९ रोजीच संपली होती. त्यापूर्वीच नागपूरला ९९ व्या नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळणार असल्याचे निश्चित झाल्याने विशेषाधिकारांतर्गत शाखा अध्यक्षांनीच सहा महिन्याचा कार्यकाळ वाढवून घेतला होता. हा अतिरिक्त कार्यकाळ २५ जुलै २०१९ रोजी पूर्ण झाला आणि त्यानंतर निवडणूका लागणे अपेक्षित होते. त्याअनुषंगाने अखेरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीचा आराखडा तयार करून तो मध्यवर्तीकडे पाठविण्यात आला. हा आराखडा मध्यवर्तीकडे तसाच पडून राहिला. त्यावरही विरोधकांनी आपले नाराजीचे सूर काढण्यास सुरुवात केली. अखेर सहा सात महिन्यानंतर ९ फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर शाखेची निवडणूक बिनविरोध पार पडली. विरोधक कुणीच नसल्याने नवी कार्यकारिणी बिनविरोध निवडली गेली.
असे असतानाही काही विरोधकांचे समाधान झाले नाही. निवडणुकीचा पत्ताच नव्हता, कुणी सांगितलेच नाही, ही अशी निवडणूक घेतली जाते का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण चर्वितचर्वणामध्ये नाट्य परिषद म्हणून, नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे पदाधिकारी म्हणून आणि या पदाधिकाऱ्यांचे विरोधक म्हणून नागपूरकर रंगकर्मींसाठी काय विशेष केले गेले, हा प्रमुख प्रश्न आहे. विरोधक म्हणून सत्ताधाºयांना त्रुटी आणि उणिवा दाखवून देण्याचे काम कधीच झाले नाही.
‘संमेलन टू संमेलन’ एवढेच काम!
९९ वे नाट्यसंमेलन फेब्रुवारी २०१९ मध्ये नागपुरात पार पडले आणि १०० व्या नाट्य संमेलनाची घोषणा झाली. २५ मार्चपासून सांगली येथून या संमेलनाचा बिगुल वाजणार आहे आणि पुढचे ७०-७५ दिवस सलग नाट्य संमेलनाची ही वारी राज्यभरात फिरणार आहे. त्यातील एक टप्पा नागपुरातही असणार आहे. म्हणजे तब्बल १४ महिने नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेकडून नागपूरकर किंवा वैदर्भीय रंगकर्मींसाठी कुठलेच उपक्रम राबविले गेले नाही. नागपूर शाखेकडून ‘संमेलन टू संमेलन’ एवढेच काम करण्याचा निर्धार झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.