स्थानिक प्रशासन विरुद्ध नाट्यकलावंत आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:26 AM2020-12-16T04:26:03+5:302020-12-16T04:26:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना आणि नाट्यप्रयोगांना परवानगीच्या नावावर झाडीपट्टी रंगभूमीवर स्थानिक प्रशासन आणि नाट्यकलावंतांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना आणि नाट्यप्रयोगांना परवानगीच्या नावावर झाडीपट्टी रंगभूमीवर स्थानिक प्रशासन आणि नाट्यकलावंतांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. संसर्गाच्या भीतीने स्थानिक प्रशासनाकडून नाट्यप्रयोगांना परवानगी नाकारली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कलावंतांनी मध्यस्थी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साद घातली आहे.
तब्बल आठ महिने सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनामुळे टाळेबंद राहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मराठी रंगभूमी दिनी ५ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी बहाल केली. त्याअनुषंगाने झाडीपट्टीमध्ये जल्लोष संचारला आणि नाट्यप्रयोगांना सुरुवातही झाली. मात्र, प्रयोगांगणिक झाडीपट्टी रंगभूमीवर कोरोना संक्रमितांचा शिरकाव झाला. त्यातही आयोजनांमध्ये शासन मार्गदर्शिकांचे पालन होत नसल्याच्या कारणाने पोलीस प्रशासन, आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांकडे नाट्यप्रयोगांना परवानगी देऊ नका, अशी विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदारांनीही या विनंतीला मान दिला. मात्र, कलावंतांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने अखिल झाडीपट्टी नाट्य महामंडळ, नाट्य निर्माता संघटना व नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रंगकर्मींनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे नाट्यप्रयोगांना परवानगी देण्याची विनंती केली आहे. न्याय न मिळाल्यास या संघटनांकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
* अनेकांनी केले प्रयोग रद्द
संक्रमणाचा जोर बघता अनेक कलावंत, नाट्यसंघांनी २०२०-२१च्या सीझनला प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आणि मिळालेले प्रयोग रद्द केले. हे सर्व संघ २०२१-२२च्या सीझनच्या तयारीला लागले आहेत. नाट्यप्रयोगांना उसळणारी गर्दी बघता आणि कोरोना नियमांचा उडणारा बोजवारा बघता हा निर्णय घेतला गेला आहे.
* ज्यांची पोटे भरली आहेत आणि ज्यांचा पर्यायी व्यवसाय आहे, त्यांनी नाट्यप्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या कलावंतांचे पोटच रंगभूमीवर निर्भर आहे, त्यांचे काय? म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नाट्यप्रयोगांना परवानगी द्यावी.
- प्रल्हाद मेश्राम, सचिव - अखिल झाडीपट्टी नाट्य महामंडळ देसाईगंज (वडसा)
..........