ललित कला विभागात गुणांचाही ‘ड्रामा’
By admin | Published: July 31, 2016 02:26 AM2016-07-31T02:26:50+5:302016-07-31T02:26:50+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागात दोन दिवस अगोदर प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा वाद पोलिसांपर्यंत गेला होता.
प्रात्यक्षिक गुणांची झाली अदलाबदल : प्राध्यापिकेची कबुली
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागात दोन दिवस अगोदर प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा वाद पोलिसांपर्यंत गेला होता. आता या विभागात चक्क गुणांचादेखील ‘ड्रामा’च झाल्याची बाब समोर आली आहे. विभागात विद्यार्थिनींच्या प्रात्यक्षिक गुणांची अदलाबदल झाली असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हे गुण देणाऱ्या प्राध्यापिकेनेच ही बाब कबूल केली आहे.
ललित कला विभागातील ‘एमएफए’च्या प्रथम वर्षातील नृत्य-कथ्थक विषयाच्या विद्यापीठ प्रात्यक्षिकासाठी दोन विद्यार्थिनी बसल्या होत्या. या विद्यार्थिनींची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची जबाबदारी डॉ. संयुक्ता थोरात यांच्याकडे होती. प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर ते गुण विद्यापीठाला पाठविण्यात येतात. परंतु हे गुण पाठविताना डॉ. थोरात यांच्याकडून गुणांची अदलाबदल झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर ही बाब समोर आली. तेव्हा परीक्षा नियंत्रकांना २५ मे रोजी पत्र पाठवून या गुणांची अदलाबदल झाली आहे, असे कळविले व गुण बदलण्यात यावे, अशी विनंती केली. डॉ. थोरात यांच्यावर विभागातीलच एक विद्यार्थिनी प्रियंका ठाकूर हिने ‘ड्रामा’ विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनात जाणूनबुजून कमी गुण दिल्याचा आरोप केला होता व हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते.
विद्यार्थिनींच्या नुकसानाला जबाबदार कोण ?
प्रात्यक्षिक गुणांच्या अदलाबदलीमुळे विद्यार्थिनींचे नुकसान झाले आहे. आता त्यांचा निकाल बदलविणेदेखील शक्य नाही. अशा स्थितीत या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.