राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह हवेत : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:41 AM2019-02-23T00:41:50+5:302019-02-23T00:43:51+5:30
मराठी नाटकांचे महत्त्व हे केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रात राहून कळत नाही. बाहेरील राज्यात गेल्यानंतर आपल्या नाटकांचे वैभव व सखोलता लक्षात येते. मराठी नाटकांना चांगले दिवस आणायचे असतील तर रसिकांना नाट्यगृहांपर्यंत आणले पाहिजे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १२०० आसनक्षमतेचे नाट्यगृह निर्माण झाले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. रेशीमबाग मैदान येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी नाटकांचे महत्त्व हे केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रात राहून कळत नाही. बाहेरील राज्यात गेल्यानंतर आपल्या नाटकांचे वैभव व सखोलता लक्षात येते. मराठी नाटकांना चांगले दिवस आणायचे असतील तर रसिकांना नाट्यगृहांपर्यंत आणले पाहिजे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १२०० आसनक्षमतेचे नाट्यगृह निर्माण झाले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. रेशीमबाग मैदान येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते.
नाट्य, साहित्य या माध्यमातून समाजनिर्मितीचा संदेश प्रसारित होत असतो. मराठी नाटक हा राज्याचा अभिमान आहे व नाटकांची वैभवशाली परंपरा आपल्याला लाभली आहे. नाटकातून मराठीचा मानदेखील वाढला आहे. मात्र नाटकांची परंपरा आणखी समृद्ध करायची असेल तर राजाश्रयासोबतच लोकाश्रयदेखील तितकाच आवश्यक आहे. मराठी नाटकांना स्वस्त दरात नाट्यगृहे उपलब्ध झाली पाहिजेत व जाहिरातीचे दरदेखील कमी ठेवले पाहिजे. असे झाले तर मराठी नाटक दहा पटींनी अधिक लोकप्रिय होईल व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील वाढेल. जर असे झाले तरच मराठी नाटकांना चांगले दिवस येतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी नितीन गडकरी यांनी कविवर्य सुरेश भट सभागृहाचे उदाहरण दिले. भट सभागृह आज नागपूरची सांस्कृतिक ओळख झाले आहे. नाट्यगृहे केवळ तयार करणेच पुरेसे ठरणार नाहीत, तर त्यांचा दर्जा टिकविणेदेखील तेवढेच आवश्यक आहे, असेदेखील ते म्हणाले.
आता नाटके पाहणे होत नाही
नितीन गडकरी यांची कला, संगीत व नाटकांप्रति असलेली आवड सर्वश्रुत आहे. यावर गडकरींनी भाष्य केले. बालपणी नागपुरात धनवटे रंगमंदिरात पणशीकर, कोल्हटकर यांच्यासह अनेकांची नाटके पाहिली. अगदी काही वर्षअगोदरपर्यंत महाराष्ट्र, मुंबईत असताना मराठी नाटके पाहण्याचा योग यायचा. मात्र दिल्लीत गेल्यापासून नाटके पाहणे होत नाही. मात्र नाटकांबद्दल असलेले प्रेम कमी झालेले नाही, अशी भावना नितीन गडकरी यांनी बोलून दाखविली.
मराठी रंगभूमीला विदर्भात स्थैर्य मिळाले : शिलेदार
एक काळ होता जेव्हा मराठी रंगभूमीचा विस्तार करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्या आव्हानात्मक परिस्थितीत मराठी रंगभूमीला विदर्भ व मराठवाड्याच्या मातीत स्थैर्य मिळाले. नाटककारांच्या पाठीशी लोक उभे ठाकले. आज तरुण रंगकर्मी वाढत आहेत. अशा तरुणांना शाबासकी देणाऱ्या रसिकांची गरज आहे, असे मत कीर्र्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.