सोलर इंडस्ट्रीजमधील स्फोटाचे डीआरडीओने घेतले घेतले सॅम्पल; दोन पथके झाली दाखल
By नरेश डोंगरे | Published: December 21, 2023 12:04 AM2023-12-21T00:04:32+5:302023-12-21T00:06:17+5:30
- घटनास्थळाची पाहणी, अधिकाऱ्यांकडून आढावा, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात - पुणे आणि दिल्लीच्या लॅबमध्ये होणार स्फोटाच्या सॅम्पलची तपासणी
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: बाजारगाव जवळच्या सोलर इंडस्ट्रीजमधील स्फोटाची चाैकशी करण्यासाठी भारतीय संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या(डीआरडीओ) तज्ज्ञांची दोन स्वतंत्र पथके आज सकाळी नागपुरात पोहचली. पथकातील अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापन तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्फोटाच्या घटनेचा आढावा घेतला आणि येथील काही सॅम्पलही ताब्यात घेतले. सोलर इंडस्ट्रीजमधील स्फोटाची चाैकशी करण्यासाठी बुधवारी डीआरडीओची पथके नागपुरात येणार असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय !
सहा महिलांसह ९ गरिब कामगारांच्या देहाच्या चिंधड्या उडविणाऱ्या सोलर इंडस्ट्रीजमधील भीषण स्फोटामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. हा प्रचंड शक्तीशाली स्फोट नेमका कसा झाला, त्याची चाैकशी नागपूर ग्रामीण पोलीस आणि पेसो करीत आहेत. सोबतीला एटीएसचे पथकही आहे. दरम्यान, सोलर इंडस्ट्रीजमधून भारतीय संरक्षण दलाला उच्च क्षमतेचा दारूगोळा पुरविला जातो. त्यामुळे या स्फोटाच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन डीआरडीओची दिल्ली तसेच पुणे येथील दोन पथके बुधवारी सकाळी नागपुरात दाखल झाली. त्यांनी सोलर इंडस्ट्रीजमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.
कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटना घडल्यापासून आजपर्यंतच्या घटनाक्रमाची माहिती घेतली. त्यानंतर घटनास्थळ परिसरातील सॅम्पल गोळा केले. या सॅम्पलची तपासणी डीआरडीओच्या लॅबमध्ये केली जाणार असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही सीसीटीव्ही फुेजचेही डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले.
दरम्यान, सुरक्षेच्या संबंधाने कंपनीकडून काय उपाययोजना केल्या जातात, त्यासंबंधानेही यावेळी माहिती घेतली. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाकडून काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे समजते.
-----
रुटीन व्हिजिट !
या संबंधाने सविवस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडे लोकमतने संपर्क केला असता ही 'रुटीन व्हिजिट' असल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले. डीआरडीओ पथकाची सुरक्षेच्या संबंधाने अशी नेहमीच व्हिजिट असते, असे सांगतानाच काही कागदपत्रे या पथकाने बघितल्याचेही ते म्हणाले.
-----
शोधकाम संपले, चाैकशी सुरू
स्फोटाच्या घटनेपासून आज सकाळपर्यंत येथे आम्ही शोधकाम केले. आज मलब्यात मिळालेल्या मृतदेहाचे सात पार्ट विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, येथून ताब्यात घेण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य साहित्याचे आम्ही विश्लेषण करीत असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लोकमतला सांगितले. आजपासून घटनास्थळावरच्या मलब्याचे शोधकाम थांबविण्यात आले आहे. चाैकशी मात्र सुरू आहे, असेही पोद्दार यांनी सांगितले.