स्फोटाच्या तपासासाठी 'सोलर इंडस्ट्रीज'मध्ये डीआरडीओची पथके; होणार सूक्ष्म तपासणी
By नरेश डोंगरे | Published: December 19, 2023 11:40 PM2023-12-19T23:40:06+5:302023-12-19T23:40:44+5:30
दिल्ली, पुण्यातील DRDO ची पथके बुधवारी तपासणीच्या कारणास्तव पोहोचणार
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कामगारांच्या देहाच्या चिंधड्या उडविणाऱ्या सोलर इंडस्ट्रीज मधील भीषण स्फोटाचे हादरे दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. या पार्श्वभूमीवर, स्फोटाची चाैकशी करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) पथके लवकरच सोलरमध्ये दाखल होणार आहेत.
अमरावती मार्गावरील सोलर इंडस्ट्रीज या स्फोटकांच्या कंपनीत रविवारी सकाळी भीषण स्फोट झाला. त्यात सहा महिलांसह ९ कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट एवढा भीषण आणि शक्तिशाली होता की मृत कामगारांच्या शरीरांचे छोटे छोटे तुकडे मलब्यात गाडले गेले. ते शोधून काढण्याचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. हा स्फोट नेमका कसा झाला, त्याला कोणती कारणे कारणीभूत आहेत, ते उघड झाले नाही. या स्फोटाचे हादरे राज्यभरातच नव्हे तर दिल्लीपर्यंत बसले आहेत. त्यामुळे डीआरडीओच्या दिल्लीतील पथकांसह ठिकठिकाणची तज्ज्ञांची पथके पुढच्या काही तासांत नागपुरात दाखल होणार आहेत.
येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आतापर्यंतच्या तपासाची माहिती जाणून घेतल्यानंतर बाहेरून आलेली मंडळी पुढचा तपास करणार आहेत. दिल्ली आणि पुण्यातील तज्ज्ञांचे पथक बुधवारी सोलरमध्ये पोहचणार असल्याची माहिती रात्री एका अधिकाऱ्याने लोकमतला दिली. स्फोट आणि स्फोटकांशी संबंधित विषयात ही पथके निष्णात असल्यामुळे पुढचा तपास त्यांच्याच मार्गदर्शनात केला जाणार आहे.
सीसीटीव्हीतून येणार स्फोटाची कल्पना
पोलिसांनी कंपनीच्या परिसरात असलेल्या मोठ्या संख्येतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क ताब्यात घेतल्या आहेत. त्यातील फुटेजचे निरीक्षण आणि विश्लेषण करणे सुरू आहे. यातून स्फोटाची वेळ अन् तीव्रता ध्यानात येणार आहे.