चैतन्यचे स्वप्न डॉक्टर होऊन आईवर उपचार करण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:24 AM2018-05-31T10:24:08+5:302018-05-31T10:24:19+5:30

अभ्यासात प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या बळावर त्याने पाहिलेले स्वप्न साकार केलेच. आता चैतन्यचे आणखी एक स्वप्न आहे, आईवर स्वत: उपचार करायचे.

The dream of Chaitanya will be done as a doctor and his mother will be treated | चैतन्यचे स्वप्न डॉक्टर होऊन आईवर उपचार करण्याचे

चैतन्यचे स्वप्न डॉक्टर होऊन आईवर उपचार करण्याचे

googlenewsNext
ठळक मुद्देचिकाटीच्या बळावर मिळविले ९५ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : नववीत असताना दीर्घ आजाराने वडील गेले. महिनाभरातच आईला अर्धांगवायूचा झटका आला. परिस्थिती फार हलाखीची होती. परंतु तडजोड केली नाही. अभ्यासात प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या बळावर त्याने पाहिलेले स्वप्न साकार केलेच. आता त्याचे आणखी एक स्वप्न आहे, आईवर स्वत: उपचार करायचे. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्र निवडले. केवळ त्याला डॉक्टर व्हायचे नाही तर त्यात संशोधन करायचे आहे.
चैतन्य प्रमोद सायरे त्या विद्यार्थ्याचे नाव. पं. बच्छराज व्यास कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी आहे. चैतन्यने बारावीत ९५ टक्के गुण मिळविले आहे. विशेष म्हणजे, भौतिकशास्त्र विषयात त्याने पैकीच्यापैकी गुण घेतले. मानेवाडा रोडलगत भाड्याची छोटीशी खोली म्हणजे चैतन्यचे घर. वडील प्रमोद हे इलेक्ट्रीशियन होते. खासगी व्यवसाय करायचे. मधुमेहामुळे त्यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले, उपचार सुरू असताना चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का चैतन्यची आई करुणा यांना बसला. दीड महिन्यातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आवाज गेला. नीट उभेही राहता येत नव्हते. अशा स्थितीत चैतन्य आणि त्याचा मोठा भाऊ शशांकने तिची शुश्रुषा केली.
घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची झाली. शेतकरी असलेल्या काका मदत करीत असला तरी मदत तटपुंजी होती. रडत-कुडत बसण्यापेक्षा चैतन्यने परिस्थितीशी दोन हात करण्याचे ठरविले. यासाठी अभ्यासाचे शस्त्र हाती घेतले. दिवस-रात्र केवळ आणि केवळ अभ्यास केला. यामुळेच त्याला हे यश गाठता आले. ‘लोकमत’शी बोलताना चैतन्य म्हणाला, आजारपणामुळे बाबांचे झालेले निधन आणि अपंग झालेल्या आईमुळेच दहावीपासूनच वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे ठरविले. बारावीचे सत्र सुरू झाले तेव्हा नियमित पाच ते सात तास अभ्यास करायचो. जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा अभ्यासाचे तास वाढविले. मी आणि मोठा भाऊ मिळून आम्ही घरचे सर्व काम करतो. त्यानेही परीक्षेच्या वेळी बरीच मदत केली. आईला चालता-फिरता किंवा बोलता येत नसले तरी तीही काळजी घ्यायची. माझे स्वप्न डॉक्टर व्हायचे असले तरी केवळ उपचारापुरतेच मर्यादित राहायचे नाही तर त्यात संशोधन करायचे आहे, असेही तो म्हणाला.

Web Title: The dream of Chaitanya will be done as a doctor and his mother will be treated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.