‘होम स्वीट होम’चे स्वप्न साकारलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:26+5:302021-09-06T04:11:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आधी पुनर्वसन नंतर प्रकल्प, असे आश्वासन स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले होते. मात्र नुकसान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधी पुनर्वसन नंतर प्रकल्प, असे आश्वासन स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले होते. मात्र नुकसान भरपाईचा तिढा अजूनही सुटलेला नाही. प्रकल्पग्रस्तासाठी होम-स्वीट-होम प्रकल्प राबविला जाईल, नुकसान भरपाई मिळेल, असे स्वप्न दाखविण्यात आले. प्रत्यक्षात ‘स्वीट होम’च्या स्वप्नात हजारो लोकांचे स्वप्न अर्धवट राहिले आहे.
भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागात १,७३० एकर क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प उभारला जात आहे. यात अनेकांची घरे आणि जागा गेली, परंतु मोबदला मिळालेला नाही. जागेचे मोजमापही झालेले नाही. प्रकल्पग्रस्तात फसवणूक झाल्याची भावना आहे. प्रकल्पासाठी जमीन, प्लॉट अधिग्रहित करताना या भागातील राजकीय नेत्यांनी मोठमोठी स्वप्न दाखविली होती. प्रत्यक्षात असे काहीच घडलेले नाही. आता नेतेही या भागात फिरकत नाही. रस्त्यांसाठी दोन वर्षापूर्वी तोडलेली काही लोकांची घरे अजूनही अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असल्याचे ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी १०२४ घरकूल बांधकाम प्रकल्पाचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी जाहिरातबाजी करण्यात आली. मात्र निवडणूक संपल्यापासून प्रकल्पाचे काम ठप्पच आहे. नावासाठीच टिप्पर व काही मजूर कामावर आहेत. दुसरीकडे रस्ते व नाल्यासाठी केलेल्या खोदकामात घाण पाणी साचले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आजार वाढले आहे.