नागपूरला प्रदूषण व अपघातमुक्त बनविण्याचे स्वप्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 10:58 AM2021-02-15T10:58:27+5:302021-02-15T10:58:54+5:30

Nagpur News नागपूरला प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त बनविण्याचे स्वप्न असून या दिशेने विविध विकासकामे सुरू करण्यात आल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

The dream of making Nagpur pollution and accident free | नागपूरला प्रदूषण व अपघातमुक्त बनविण्याचे स्वप्न 

नागपूरला प्रदूषण व अपघातमुक्त बनविण्याचे स्वप्न 

Next
ठळक मुद्देखापरी आरओबीचे लोकार्पण, मेट्रो तिसऱ्या टप्प्यासाठी डीपीआर

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये नागपूरचा समावेश करण्यासाठी स्वच्छ व सुंदर शहरासोबतच नागपूरला प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त बनविण्याचे स्वप्न असून या दिशेने विविध विकासकामे सुरू करण्यात आल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

वर्धा रोडवरील एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनच्या सभागृहात रविवारी झालेल्या खापरी आरओबीचे लोकार्पण आणि विविध कॉंक्रिट रस्ते प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते वर्धा रोडवर ७०.९८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून तयार झालेल्या १.१२ किमी लांबीच्या नवीन खापरी रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि रहाटे कॉलनी ते खापरी आरओबीपर्यंत ११४ कोटींच्या गुंतवणुकीतून ५.६ किमी रस्ता, खापरी आरओबी ते मनीषनगर लेव्हल क्रॉसिंगपर्यंत २७ कोटींच्या गुंतवणुकीतून ३.१० किमी आणि शुक्रवार तलाव ते अशोक चौकापर्यंत २४ कोटींच्या गुंतवणुकीतून कॉंक्रिट रोडचे भूमिपूजन करण्यात आले.

समारंभात महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, गृहमंत्री अनिल देशमुख (ऑनलाईन), विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वरिष्ठ नेते दत्ता मेघे, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके, माजी आमदार अनिल सोले, माजी महापौर नंदा जिचकार, अर्चना डेहनकर, प्रभागाचे नगरसेवक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सीजीएम राजीव अग्रवाल, सीजीएम आशिष असाटी, जीएम अभिजित जिचकार, डीपी जैन कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक गिरीश जैन यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, वर्ष १९९८ मध्ये राज्यात मंत्री असताना सध्याचा खापरी आरओबी बनविला होता. त्यावेळी चार पदरी बनविण्याची इच्छा होती, पण निधीअभावी बनविता आला नाही. आता खापरीत नवीन आरओबीच्या लोकार्पणाचा आनंद आणि अभिमान आहे. रेल्वेमुळे वर्धेत आरओबीचे काम अडकले आहे. अशी ८१ कामे थांबली आहेत. आरओबी प्रकरणाच्या तपासणीसाठी चौकशी समिती तयार केली आहे. नाशिक नियो मेट्रोच्या धर्तीवर नागपुरात अमरावती रोडपर्यंत नियो मेट्रो चालविण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी महामेट्रोला सांगितले आहे. मिहान प्रकल्पात दोन वर्षांत नागपूरसह विदर्भातील एक लाख युवकांना रोजगार दिल्याचे गडकरी यांनी सांगितले.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी नवीन खापरी आरओबीमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असल्याचे सांगितले.

प्रास्तविक एनएचएआयचे सीजीएम राजीव अग्रवाल यांनी केले. संचालन आसावरी देशपांडे आणि एनएचएआयचे जीएम अभिजीत जिचकार यांनी आभार मानले.

उपराजधानीत होतोय शाश्वत विकास : फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन खापरी पुलामुळे वाहतूक समस्या सुटली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. त्यामुळे नागपूरचे चित्र बदलत आहे. येथे शाश्वत विकास होताना दिसत आहे. मिहानमध्ये सर्वोत्तम संस्था येत आहेत. मेट्रोच्या दुसरा टप्पा तयार झाल्यानंतर लोक कमी खर्चात आणि वेळात नागपुरात येतील.

नागपूर-काटोल चार पदरी काम लवकर सुरू व्हावे : देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, खापरी आरओबी सुरू झाल्याने वाहतूक समस्या मार्गी लागली आहे. नितीन गडकरी यांनी नागपूर-काटोल चार पदरी प्रकल्प, ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करावे. गोवारी उड्डाणपूलाच्या कमी रूंदीमुळे होणारे अपघात थांबविण्यासाठी उड्डाणपूलाला स्टँडर्ड टू लेन करण्याचा आग्रह केला. यावर गडकरी यांनी काटोल-नागपूर चारपदरी प्रकल्पासाठी राज्याच्या वन मंत्रालयाकडून मंजूरी मिळवून देण्यासाठी देशमुख यांना सहकार्याचे आवाहन केले. मंजूरी मिळताच या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल.

 

Web Title: The dream of making Nagpur pollution and accident free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.