नागपुरच्या इतवारीतील सुपारी व्यापाऱ्यावर ‘डीआरआय’ची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:03 PM2018-01-18T23:03:00+5:302018-01-18T23:06:59+5:30
इतवारी येथील एका सुपारी व्यापाऱ्याच्या कार्यालयावर गुरुवारी डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) ने धाड टाकली. सुपारी व्यापारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याने या कारवाईमुळे इतवारीतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी येथील एका सुपारी व्यापाऱ्याच्या कार्यालयावर गुरुवारी डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) ने धाड टाकली. सुपारी व्यापारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याने या कारवाईमुळे इतवारीतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
इतवारी मस्कासाथ येथील मेमन जमान बिल्डिंग मध्ये आसिफ कलीवाला यांचे जे.के. ट्रेडर्स आहे. कलीवाला हे सुपारीचे मोठे व्यापारी आहेत. सूत्रानुसार डीआरआयच्या पथकाने दुपारी ३ वाजता कलीवाला यांच्या कार्यालयात धाड टाकली. कार्यालयाची तपासणी करून उपस्थित लोकांची विचारपूस केली. रात्री ९ वाजेपर्यंत ही विचारपूस सुरू होती. त्यानंतर पथक परतले.
सूत्रानुसार सहा महिन्यांपूर्वी डीआरआयने मुंबईत इर्शाद नावाच्या एका सुपारी व्यापाऱ्यास पकडले होते. इर्शाद हा आसाम सीमेवरून सडलेली सुपारी लपवून आणत होता. तो दरदिवशी कोट्यवधी रुपयाची प्रतिबंधित विषारी सुपारी नागपूरला पाठवत होता. इतवारीतील अनेक सुपारी व्यापारी त्याच्याशी जुळलेले होते. डीआरआयने त्याची विचारपूस केली तेव्हा त्याच्याशी संबंधित व्यापाऱ्यांचे नाव समोर आले. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. कलीवाला हे भाजपाचे पदाधिकारी सुद्धा आहे. त्यामुळे या कारवाईची बरीच चर्चा होत आहे. इतवारीतील अनेक व्यापारी सडलेल्या सुपारीचा व्यवसाय करतात. शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची चांगली चलती आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही.
इर्शादच्या अटकेला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. परंतु इतक्या उशिरा कारवाई झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. या कारवाईमुळे अनेक सुपारी व्यापाऱ्यांचे चेहरे पडले आहेत. आपल्यावरही कारवाई होऊ शकते, अशी त्यांना भीती आहे. डीआरआयने या प्रकरणाची कसून चौकशी केल्यास अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित सुपारी व्यापाऱ्यांनी नुकतीच कोट्यवधी रुपयांची जमीनसुद्धा खरेदी केली आहे.