ज्येष्ठांसाठी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन 'सेवा सुरु ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:07 AM2021-05-15T04:07:47+5:302021-05-15T04:07:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई पाठोपाठ नागपुरातही ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेवेला सुरुवात झाली. नागपूर महानगरपालिकेने शुक्रवारपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई पाठोपाठ नागपुरातही ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेवेला सुरुवात झाली. नागपूर महानगरपालिकेने शुक्रवारपासून ही सेवा सुरु केली. शुक्रवारी बैद्यनाथ चौक येथील ट्रिलीयन मॉलमध्ये पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते तर ग्लोकल स्क्वेअर मॉल या ठिकाणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पालकमंत्र्यांनी वाहनात आलेल्या श्यामदास छाबराणी (८३ वर्ष ), कृष्णा छाबराणी (६२ वर्ष ) या ज्येष्ठांचे लसीकरण केल्यानंतर गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार अभिजित वंजारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.,स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर,मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धंतोली विभागाच्या सभापती वंदना भगत, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त किरण बगडे, यांच्यासह अन्य पदाधिकारी व आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्या नेतृत्वातील आरोग्य पथक उपस्थित होते.
नागपूर शहरातील ज्या नागरिकांना स्वतः एकटे येणे शक्य नाही, जे ज्येष्ठ नागरिक अंथरूणाला खिळून आहेत. किंवा अन्य आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. अशा ६० वर्षावरील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने स्वतःच्या वाहनांमध्ये याठिकाणी आणल्यास वाहनात बसून असतानाच त्यांचे महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून लसीकरण केले जाते. या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय ऑटोमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना आणले जाऊ शकते. जे ज्येष्ठ नागरिक स्वतःचे वाहन, दुचाकी चालवू शकतात, त्यांना देखील या ठिकाणी सुविधा दिली जाणार आहे, तथापि ही सुविधा केवळ ६० वर्षावरील असाह्य ज्येष्ठ नागरिकांसाठी असून नागपुरातील तरुणाईने यासाठी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना याठिकाणी पोहोचवून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी मदत करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.