नागपुरात नादुरुस्त ट्रकचा चालक राहिला दोन दिवस उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:44 PM2020-03-25T23:44:07+5:302020-03-25T23:47:10+5:30
आंध्र प्रदेशातून माल घेऊन नागपुरात पोहचलेला मालवाहू ट्रक रेडिसन चौकात मंगळवारी बंद पडला. या अनोळखी शहरात सारेच बंद असल्याने भुकेने व्याकूळ झालेला ट्रकचालक ढसाढसा रडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंध्र प्रदेशातून माल घेऊन नागपुरात पोहचलेला मालवाहू ट्रक रेडिसन चौकात मंगळवारी बंद पडला. या अनोळखी शहरात सारेच बंद असल्याने भुकेने व्याकूळ झालेला ट्रकचालक ढसाढसा रडला. अखेर पोलीस मदतीला धावले. बिस्किटे देऊन दिलासा दिलासा दिला.
गणेश पर्ताळे असे या ट्रकचालकाचे नाव असून त्याच्यासोबत बाबासाहेब सोनकांबळे नावाचा क्लीनर आहे. हे दोघेही नांदेड येथे राहणारे आहेत. एमएच २६, एडी -२२४८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये येथील व्यापाऱ्याचा माल घेऊन ते आंध्रप्रदेशातून दोन दिवसांपूर्वी निघाले. नागपुरात पोहचल्यावर सोमवारी रात्री रेडिसन्स चौकात ट्रक बंद पडला. शहर अनोळखी. त्यातल्या त्यात संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद पडलेले. अशा अवस्थेत त्यांनी रात्र काढली. मंगळवारी काहीतरी मार्ग निघेल म्हणून वाट पाहिली. मात्र कोणतीही मदत मिळाली नाही. उपाशीपोटी असलेल्या या दोघांचाही जीव कासावीस झाला. संचारबंदीमुळे चौकात वाहतूक पोलिसाच्या ड्यूटी लागली आहे. गुणवंता देवतळे या वाहतूक शिपायाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी आपल्या जवळची बिस्किटे त्यांना दिली. पाणीही दिले. या बिस्किटावर त्यांनी रात्र काढली. यातच बुधवार उगवला. आता आपले काही खरे नाही, याची जाणीव झाल्याने धीर सोडलेला ट्रकचालक ढसाढसा रडला. बुधवारी नागपुरातील संबंधित व्यापाऱ्यासोबत संपर्क झाला. त्याने ताजबागमध्ये राहणाºया रशिद खान नावाच्या आपल्या कामगाराच्या माध्यमातून बुधवारी दुपारी टिफीन पुरविण्याची व्यवस्था केली. मात्र या कामगाराला मार्गात पोलिसांनी अडवले. त्यातून कसाबसा मार्ग काढत त्याने टिफीन पोहचविला. दोन दिवसांनंतर या दोघांना बुधवारी दुपारी अन्न मिळाले. या मदतीमुळे बुधवारची सोय झाली असली तर समस्या मात्र कायमच आहे.