धावत्या बसमध्ये चालकाला आला हृदयविकाराचा झटका; प्रवासी थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 10:45 PM2023-03-23T22:45:06+5:302023-03-23T22:46:26+5:30

Nagpur News चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने अनियंत्रित झालेल्या बसने दुचाकी व नंतर ट्रॅक्टर ट्रॉलीला जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास नागपूर-उमरेड महामार्गावरील गंगापूर बस थांब्याजवळ घडली.

Driver suffers heart attack in running bus; The passengers narrowly escaped | धावत्या बसमध्ये चालकाला आला हृदयविकाराचा झटका; प्रवासी थोडक्यात बचावले

धावत्या बसमध्ये चालकाला आला हृदयविकाराचा झटका; प्रवासी थोडक्यात बचावले

googlenewsNext

नागपूर : चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने अनियंत्रित झालेल्या बसने दुचाकी व नंतर ट्रॅक्टर ट्रॉलीला जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास नागपूर-उमरेड महामार्गावरील गंगापूर बस थांब्याजवळ घडली. यात बसमधील प्रवासी सुखरूप असून अपघातात दुचाकी चालक मात्र गंभीर जखमी झाला आहे.

गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एसटीच्या वाशिम आगारातून बसचालक सिद्धार्थ गणपत सहारे (वय ३५, रा. लाखांदूर, जि. भंडारा) हे एमएच ४०, एक्यू ६२७० क्रमांकाची बस घेऊन नागपूर-उमरेड मार्गाने पवनीकडे घेऊन निघाले. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास बस नागपूर-उमरेड मार्गावरील गंगापूर बस थांब्याजवळ असतानाच अचानक सिद्धार्थ यांच्या छातीत दुखणे भरले. छातीत जोरदार कळ आल्याने त्यांचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बस अनियंत्रित झाली. दरम्यान वेकोली कोळसा खदान येथून कावरापेठकडे जाणाऱ्या केवलराम अनिल मडावी (वय २४, रा. चिंधीमाल, ता. नागभिड) यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३४, एई ३७६५ ला जोरदार धडक दिली. धडक बसताच केवलराम रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले. दुचाकीनंतर बसने ब्रोव्हिंग मशीनच्या ट्रॅक्टर ट्रॉलीलाही धडक दिली. उमरेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि बसचालक सिद्धार्थ सहारे व दुचाकीचालक केवलराम मडावी यांना उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर त्यांना नागपूरला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.

दुचाकीला नेले फरपटत

- दुचाकीचालक केवलराम मडावी हा कोळसा खदानीतील एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. कावरापेठ येथे भाड्याने राहत असलेल्या खोलीकडे निघाला होता. दरम्यान एसटीची जोरदार धडक बसली. धडक लागताच केवलराम रस्त्याच्या कडेला पडला आणि गंभीर जखमी झाला. एसटीच्या चाकात दुचाकी अडकल्याने ती बऱ्याच अंतरापर्यंत फरपटत गेली. यामुळे दुचाकीचा चेंदामेंदा झाला. बसमध्ये ६० ते ६५ प्रवासी होते. ते या अपघातात बालंबाल बचावले आहेत.

Web Title: Driver suffers heart attack in running bus; The passengers narrowly escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात