खंडणी दिली नाही म्हणून कारचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:12 AM2020-06-19T00:12:07+5:302020-06-19T00:14:40+5:30
खंडणी वसुलीसाठी वापरलेल्या कारच्या चालकाला कुख्यात ठगबाज प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा आणि तिच्या साथीदारांना खंडणी दिली नाही म्हणून प्रीतीशी सख्य असलेल्या पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खंडणी वसुलीसाठी वापरलेल्या कारच्या चालकाला कुख्यात ठगबाज प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा आणि तिच्या साथीदारांना खंडणी दिली नाही म्हणून प्रीतीशी सख्य असलेल्या पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले. एवढेच नव्हे तर जामिनावर आल्यानंतर त्याला कुख्यात गुन्हेगारासारखी वागणूक दिली. प्रशांत जयकुमार असे या पीडिताचे नाव असून त्याने प्रीतीच्या पापात सहभागी असलेल्या पोलिसांची मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
प्रीती सध्या पाचपावली पोलिसांच्या कोठडीत असून तिच्या पापाचे नवनवे किस्से रोज उघड होत आहेत. प्रशांत यांनी आज सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या त्यांच्या तक्रारीनुसार, २२ जुलै २०१९ ला रंजना पराते नामक आरोपी महिलेने तिच्या साथीदारांसह संजय शाहू यांचे अपहरण केले होते. आरोपींनी त्यासाठी प्रशांतची कार भाड्याने घेतली होती. त्या कारमध्ये आरोपी आणि तरुणांचे भांडण सुरू झाल्याने प्रशांतने सर्वांना कारमधून उतरवून दिले आणि तो आपली कार घेऊन घरी निघून गेला. हे प्रकरण पाचपावली पोलिस ठाण्यात तपासाला आले होते. या प्रकरणातील आरोपींना कार भाड्याने दिली म्हणून पोलिसांनी प्रशांतलाही चौकशीसाठी बोलावून घेतले आणि त्याला सहआरोपी म्हणून कारागृहात पाठविले. दरम्यान, कुख्यात प्रीती दास प्रशांतच्या घरी धडकली. तिने प्रशांतची पत्नी सविता यांना २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. सविताने पैसे देण्यास नकार दिला म्हणून तिला मनीष गोडबोले नामक उपनिरीक्षक तसेच अन्य काही पोलिसांनी धमकावल्याचा आरोप प्रशांत आणि त्याच्या पत्नीने तक्रारीत केला आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रशांतला जामीन मिळाला. त्यानंतर प्रीती दास आणि पाचपावली ठाण्यातील मंडळींनी त्याचा व त्याच्या पत्नीचा छळ सुरू केला. कुख्यात गुन्हेगारासारखे ते त्याला वागणूक देऊ लागले. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या नावाखाली त्याला वारंवार ठाण्यात बोलवून कागदावर सह्या करण्यासाठी बाध्य करू लागले. प्रशांत आणि त्याच्या पत्नीने आपली छळ कथा तक्रारीच्या रूपात लिहून ती मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांसह संबंधित वरिष्ठांकडे पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.