ड्रोन फिरतंय आकाशी, रोजगार तुमच्या हाताशी; नागपूरकर प्रणव, अनिकेतने दिले दहा हातांना काम 

By जितेंद्र ढवळे | Published: August 7, 2023 02:32 PM2023-08-07T14:32:45+5:302023-08-07T14:34:23+5:30

नव्या शहरांची रचना, जंगलात सीडबॉल सोइंग तर शत्रूवर वॉच ठेवतंय ड्रोन

Drones are flying in the sky, employment is at your fingertips; Nagpurkar Pranav, Aniket gave work to ten hands | ड्रोन फिरतंय आकाशी, रोजगार तुमच्या हाताशी; नागपूरकर प्रणव, अनिकेतने दिले दहा हातांना काम 

ड्रोन फिरतंय आकाशी, रोजगार तुमच्या हाताशी; नागपूरकर प्रणव, अनिकेतने दिले दहा हातांना काम 

googlenewsNext

जितेंद्र ढवळे

नागपूर : ड्रोन म्हटलं की आकाशात घिरट्या घालणारं छोटं हेलिकॉप्टर असा आपला साधा समज आहे! श्रीमंतांच्या घरचं लग्नकार्य, राजकीय पक्षांच्या मोठ्या सभा असल्या की त्या शूट (चित्रित) करण्यासाठी ड्रोन आकाशात घरट्या घालताना हमखास दिसतं. मात्र हेच ड्रोन डिफेन्स सर्व्हिसमध्ये हेरगिरीचे, शत्रूच्या गुप्त स्थळावर अचूक मारा करण्यासाठी, राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी, मोठ्या शहरांची रचना करण्यासाठी (टाउन प्लॅनिंग), जंगलात झाडं लावण्यासाठी इतकेच काय तर आपल्या शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी आता मदत करतयं!

न्यू इंडियाच्या प्रगतीत ड्रोन काय करू शकतं? यातून रोजगाराच्या संधी कशा मिळू शकतात? विविध कामांसाठी ड्रोनचे डिझाइन कसं असायला हवं यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये संशोधनाचे कार्य एरोनॉटिकल इंजिनिअर असलेला नागपूरकर प्रणव खेरगडे आणि नाशिकचा अनिकेत देवरे करीत आहेत. ड्रीम इनोव्हेटर्स या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी स्टार्टअप सुरू केलाय. यात त्यांनी दहा तरुणांना रोजगारही दिला. आजमितीला २० हून अधिक राज्यात या टीमने काम केले आहे.  

कशी मिळाली प्रेरणा?

प्रियदर्शिनी कॉलेजमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करताना आयआयटी खरगपूर येथे बोइंग कंपनीच्या एरोमॉडलिंग आणि डिझाइन स्पर्धेत या दोघांनी भाग घेतला. यात ड्रोनचे नवे डिझाइन विकसित करून त्यांनी पेलोडवर काम केले. यात त्यांनी पहिला नंबरही पटकाविला होता. कोविड काळात त्यांनी स्टार्टअप सुरू केला. यातच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने अमरावती विद्यापीठात आयोजित स्पर्धेत ड्रोनच्या माध्यमातून जंगलात सीडबॉल सोइंग करणे कसे शक्य आहे, यावर त्यांनी सादरीकरण केले होते. यातही त्यांच्या मॉडेलने नंबर पटकाविला होता. यानंतर नागपूर विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये त्यांच्या टॅलेन्टला बळ मिळाले. 

काय करून दाखविलं?

गत तीन वर्षांत या तरुणांनी शाळा-महाविद्यालय असो की शासकीय यंत्रणेतील अधिकारी यांना ड्रोनची उपयोगिता आणि डिझाइन यावर प्रशिक्षण दिलं. इतकंच काय तर राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण, ओडिशा आणि महाराष्ट्रातील सोलापूर येथे नगररचना करण्यासाठी ड्रोन मॅपिंग,  तुळजापूर येथे सोलर प्लांटचे थर्मल कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वक्षण करून तांत्रिक बिघाड कसा शोधायचा तर महाराष्ट्रातील लातूर, आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे ड्रोनमध्ये मल्टी स्पेक्ट्रल कॅमेऱ्याचा उपयोग करून प्रिसीजन ॲग्रिकल्चर (झाडांचे व्यवस्थापन) ही संकल्पनाही यशस्वी करून दाखविली. मायनिंग क्षेत्रातही ड्रोन उत्पादन आणि निरीक्षणात कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, यावरही या तरुणांनी काम केलंय.

ड्रोनचे प्रकार?

१) ड्रोनचे खूप प्रकार आहेत. यात सिंगल रोटर या प्रकारामध्ये फक्त एकच रोटर असतो तर ट्राय कॉप्टर यामध्ये तीन वेगवगळ्या प्रकारच्या मोटर असतात आणि तीन कंट्रोलर आणि एक सर्वो मोटर असते. 
२) क्वाडकॉप्टर यामध्ये चार वेगवेगळ्या रोटर ब्लेडसचा वापर केला जातो. यात दोन मोटर घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरतात आणि दोन मोटर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात.
३) हेक्साकॉप्टर यात ६ मोटर ब्लेडचा वापर केला जातो. यामध्ये तीन मोटर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात आणि तीन मोटर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात.
४) ऑक्टॉप्टर यासमध्ये आठ मोटर ब्लेडचा आणि आठ प्रोपेलरचा वापर केला जातो.

काय आहेत ड्रोनचे फायदे? 

रिसर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन, ट्रॅफिक नियंत्रण, मिलिटरी सर्व्हिसमध्ये सर्व्हिलन्स, हवामान तपासण्यासाठी, शेतीचे व्यवस्थापन तर खेळाच्या सामन्याच्या प्रक्षेपणासाठीदेखील ड्रोनचा वापर केला जातो.

ड्रोन कशा पद्धतीने बनवले जातात?
१) चेसिस हे ड्रोनचा मूलभूत अंग असते. चेसिस डिझाइन करताना त्याच्या शक्तीची (स्ट्रेंग्थ) विशिष्ट काळजी घेतली जाते.
२) प्रॉपेलर ड्रोनवरती किती वजन असावे किंवा ड्रोनची गती किती असावी हे या प्रोपेलरवर आधारित असते. जेवढेे उंचीला मोठे प्रोपेलर असतात तेवढा तो ड्रोन जास्त वजन उचलू शकतो. परंतु मोठ्या उंचीच्या प्रोपेलरची गती नियंत्रित करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. छोटी उंची असलेले प्रोपेलर कमी वजनाच्या वस्तू उचलू शकतो. 
३) प्रत्येक प्रोपेलरवरती एक मोटर लावलेली असते आणि त्या मोटरची रेटिंग केव्ही युनिट्सवरून दिली जाते.
४) इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर हे प्रत्येक मोटरला कंट्रोल करंट प्रदान करते, जेणेकरून गती प्राप्त होईल.
५) फ्लाइट कंट्रोलर हे ते कॉम्प्युटर प्रोग्राम असते जे की येणारे सिग्नल जो की पायलटद्वारे पाठवले असते आणि हे फ्लाइट कंट्रोलर हे सिग्नल ईएससीला पाठवते.
६) रेडिओ रिसिवर  हे पायलटद्वारे आलेल्या सिग्नलला रिसिव्ह करतात.
७) साधारण ड्रोनमध्ये लिथियम पॉलिमर बॅटरीचा वापर केला जातो.

Web Title: Drones are flying in the sky, employment is at your fingertips; Nagpurkar Pranav, Aniket gave work to ten hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.