वाळूघाटासह गौण खनिज उत्खननावर आता असणार 'ड्रोन'चा वॉच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:42 IST2025-01-17T18:41:48+5:302025-01-17T18:42:48+5:30
Nagpur : विभागीय आयुक्त बिदरी यांचे कडक निर्देश

Drones will now be on watch over minor mineral extraction including sand pits
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध वाळू व गौण खनिजाच्या उत्खननावर आळा घालण्यासाठी व दोषींवर तत्काळ कठोर कारवाई व्हावी या दृष्टीने जिल्ह्यातील वाळूघाट व खदानींवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. वाळूघाट व गौण खनिजसंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ड्रोनद्वारे प्रत्यक्ष जागेवरचे फुटेज आपल्या हाती लागल्यामुळे गुन्हेगारांवर सप्रमाण गुन्हा सिद्ध करण्यासह अशा कारवाईतील पारदर्शकता वाढीस लागेल. याच बरोबर शासनाच्या कारवाई पथकाला सुरक्षित राहून यामार्फत पुरावे गोळा करता येतील. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रगत सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज ड्रोनद्वारे वेळीच कारवाई करणे शक्य होईल. मनुष्यबळाच्या साहाय्याने. यात अचूकता असल्याने संबंधित गुन्हेगारांना वेगळा वचक निर्माण होईल. या बैठकीस पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, एसपी डॉ. हर्ष पोद्दार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ४० वाळूघाट
जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत ४० वाळूघाट आहेत. या घाटावरून यापुढे वाळूची तस्करी रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळेल. वाळूघाटासमवेत अवैध खनिज उत्खननाला मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल, असा विश्वास विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केला.