अवकाळी पावसाचा तडाखा

By admin | Published: May 5, 2017 02:53 AM2017-05-05T02:53:42+5:302017-05-05T02:53:42+5:30

जिल्ह्यात वादळ आणि अवकाळी पावसाने बुधवारी रात्री सर्वदूर हजेरी लावली. वादळामुळे कळमेश्वर, सावनेर तालुक्यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती

Drought | अवकाळी पावसाचा तडाखा

अवकाळी पावसाचा तडाखा

Next

आंब्यासह भाजीपाल्याचे नुकसान : विजांच्या कडकडाटाने भीतीचे वातावरण
नागपूर : जिल्ह्यात वादळ आणि अवकाळी पावसाने बुधवारी रात्री सर्वदूर हजेरी लावली. वादळामुळे कळमेश्वर, सावनेर तालुक्यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने ताराही तुटल्या होत्या. काही गावांत रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता तर काही गावांमध्ये रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता. या पावसामुळे गावरान आंबे मोठ्या प्रमाणात गळाले असून, भाजीपाल्याच्या पिकांचेही नुकसान झाले. विजांचा लख्ख प्रकाश आणि कडकडाटामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वीज कोसळल्याने किंवा अन्य कारणांमुळे जिल्ह्यात कुठेही प्राणहानी झाली नाही.
नरखेड शहरासह परिसरातील गावांमध्ये बुधवारी रात्री ११.१० ते ११.३० या काळात वादळासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या काळात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काटोल शहर व परिसरात तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. कळमेश्वर शहर तसेच तालुक्यातील मोहपा व अन्य गावांमध्ये जोरदार वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कळमेश्वर शहर व परिसरात रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वादळाला सुरुवात झाली. या वादळाचा जोर कमी-अधिक प्रमाणात मध्यरात्री १ वाजेपर्यंत कायम होता. तालुक्यातील मोहपा शहर व परिसरात रात्री ११.३० ते मध्यरात्री २.३० वाजताच्या दरम्यान वादळाचा जोर कायम होता. या काळात पावसाच्या सरीही कोसळल्या.
सावनेर शहरासह परिसरात तसेच तालुक्यातील पाटणसावंगी, पिपळा (डाकबंगला), इसापूर, गोसेवाडी, वलनी, सिल्लेवाडा, खापरखेडा, चनकापूर परिसरात मध्यरात्री १ वाजतापासून वादळाला सुरुवात झाली. मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत वादळाचा जोर कायम होता. सावनेर शहरात रात्री १२.४५ वाजतापासून वादळाला सुरुवात झाली. शहरासह काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. पारशिवनी शहरासह कन्हान शहरात व परिसरात रात्री १०.३० ते मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत वादळी वारा वाहत होता. त्यामुळे नागरिकांना विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागले. भिवापूर शहरात सायंकाळी ६ वाजतापासून वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. रात्री ८ वाजताच्या सुमारास वादळाचा जोर वाढला होता. तालुक्यातील नांद, भगवानपूर व परिसरातील गावांमध्ये मध्यरात्री २.३० वाजता वादळासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या परिसरात अंदाजे एक तास पावसाच्या सरी कोसळल्या. कुही तालुक्यातील कुही मांढळ, पचखेडी परिसरात सायंकाळी ६ ते रात्री ८.३०, नंतर रात्री ११.३० व मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. उमरेड तालुक्यातील बेला व परिसरात मध्यरात्री २ वाजतापासून वादळालाला सुरुवात झाली. या परिसरात एक तास पावसाच्या सरी कोसळल्या. कामठी शहरासह परिसरात मध्यरात्री १ वाजतापासून वादळी पावसाला सुरुवात झाली. कोराडी, महादुला परिसरात मध्यरात्री पाऊस झाला. मौदा शहरासह तालुक्यात मध्यरात्री २ नंतर पावसाला व वादळाला सुरुवात झाली. धामणा येथे मध्यरात्री १.४५ वाजताच्या सुमारास वादळासह पाऊस तसेच मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास बुटीबोरी, टाकळघाट, सोनेगाव (लोधी) येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. रामटेक शहरासह परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. दरम्यान, जिल्ह्यात गारपीट झाल्याची किंवा कारणांमुळे प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. (प्रतिनिधींकडून)

वीजपुरवठा खंडित
वादळामुळे सावनेर शहर, तालुक्यातील पाटणसावंगी, पिपळा (डाकबंगला), वलनी, इसापूर, गोसेवाडी, उमरेड तालुक्यातील बेला, भिवापूर तालुक्यातील नांद व भगवानपूर, कळमेश्वर शहर व तालुक्यातील मोहपा व परिसरातील काही गावे, कुही तालुक्यातील कुही, मांढळ, पचखेडी, सोनेगाव (लोधी), रामटेक शहर व परिसरातील काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. इसापूर व गोसेवाडी गावांमधील वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. कामठी शहर, तालुक्यातील कोराडी, महादुला, कन्हान, नरखेडसह अन्य गावांमध्ये रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता.
झाडे कोसळली
वादळामुळे कळमेश्वर तालुक्यात विजेचे खांब वाकल्याने तारा तुटल्या होत्या, शिवाय काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली होती. नागपूर-कळमेश्वर मार्गावर काही ठिकाणी रोडवर बाभळीची झाडे पडली होती. मध्यरात्री या मार्गावर कमी वाहतूक असल्याने फारसा परिणाम जाणवला नाही. सकाळी ही झाडे तोडून मार्ग मोकळा करण्यात आला होता. रामटेक परिसरातही काही ठिकाणी झाडे कोसळली.

Web Title: Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.