दुष्काळाची झळ सर्वच गावांना
By admin | Published: December 31, 2014 01:03 AM2014-12-31T01:03:07+5:302014-12-31T01:03:07+5:30
राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पैसेवारीच्या संदर्भात सुधारित अहवाल राज्य शासनाला पाठविला असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच खरीप गावांना दुष्काळाची झळ बसली आहे.
सुधारित अहवाल : सर्वच पिकांना फटका
नागपूर: राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पैसेवारीच्या संदर्भात सुधारित अहवाल राज्य शासनाला पाठविला असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच खरीप गावांना दुष्काळाची झळ बसली आहे. त्याचा फटका खरीप पिकांच्या उत्पादनाला बसला असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
२०१३-१४ या वर्षात नागपूर जिल्ह्यातील नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्ह्यातील १७९५ खरीप गावांपैकी ५२५ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी होती आणि १२७० गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त होती. मात्र ज्या गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त होती ती गावेही सुधारित पैसेवारी काढण्याच्या वेळेपर्यंत दुष्काळी गावाच्या यादीत समाविष्ट होतील अशी शक्यताही वर्तविण्यात आली होती. दरम्यान राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने शासनाने केंद्राकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी केली होती. त्यासाठी सुधारित पैसेवारीची गरज होती. मात्र ती १५ जानेवारीपर्यंत येत असल्याने तोेपर्यंत थांबणे शक्य नव्हते कारण शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी सार्वत्रिक मागणी होती. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन १५ जानेवारीची वाट न पाहता खरीप पिकांची स्थिती लक्षात घेऊन अंदाजे सुधारित आणेवारी ३० डिसेंबरपूर्वी पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार नागपूर जिल्हा प्रशासनाने सुधारित पैसेवारीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व खरीप गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच गावात दुष्काळाचा फटका पिकांना बसला असून त्यामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती, सूत्रांनी दिली.
संपूर्ण राज्यातून प्राप्त झालेल्या सुधारित पैसेवारीच्या आधारावर राज्य शासन केंद्राकडे मदतीचा सुधारित प्रस्ताव सादर करणार आहे. या अहवालाचा आधार घेतला तर केंद्राकडून मिळणारी मदत ही सर्वसमावेशक राहण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)