आंतरशालेय विभागीय क्रीडास्पर्धेत सुविधांचा दुष्काळ : विद्यार्थ्यांची सतत फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:10 PM2018-10-09T23:10:27+5:302018-10-09T23:13:07+5:30
मानकापूर क्रीडा संकुल परिसरात सुरू असलेल्या आंतरशालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत विविध जिल्ह्यातून खेळाडू मंगळवारी सकाळी पोहचले. पण आयोजकांनी ऐनवेळी काही खेळ रद्द करून दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरविल्याने, बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांची चांगलीच गोची झाली. आयोजकांनी बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंसाठी कुठलीही निवासाची व्यवस्था न केल्याने काही खेळाडूंनी परतीचा मार्ग धरला, तर काहीनी शहरात इतरत्र ठिय्या मांडल्याची माहिती आहे. बाहेरगावहून येणाऱ्या खेळाडूंमध्ये मुलींचे प्रमाण मोठे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापूर क्रीडा संकुल परिसरात सुरू असलेल्या आंतरशालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत विविध जिल्ह्यातून खेळाडू मंगळवारी सकाळी पोहचले. पण आयोजकांनी ऐनवेळी काही खेळ रद्द करून दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरविल्याने, बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांची चांगलीच गोची झाली. आयोजकांनी बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंसाठी कुठलीही निवासाची व्यवस्था न केल्याने काही खेळाडूंनी परतीचा मार्ग धरला, तर काहीनी शहरात इतरत्र ठिय्या मांडल्याची माहिती आहे. बाहेरगावहून येणाऱ्या खेळाडूंमध्ये मुलींचे प्रमाण मोठे होते.
शुक्रवारपासून या स्पर्धांना सुरुवात झाली आहे. जिल्हास्तरावर स्पर्धा आटोपल्यानंतर आता विभागीय स्तरावर स्पर्धां होत आहेत. या स्पर्धेसाठी नागपूरसह वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथून विद्यार्थी व विद्यार्थिनी आल्या आहेत. स्पर्धेदरम्यान सोईसुविधांचा दुष्काळ मंगळवारीही कायम होता. पिण्याचे पाणी मुबलक असले तरी, मुलींसाठी चेंजिंग रुम, शौचालय, उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय, खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था दिसली नाही. आजही खेळाडू उन्हात होते. बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली परंतु उन्हाची तीव्रता असल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. क्रीडा संकुल परिसरातील झाडांच्या सावलीत विद्यार्थी व शिक्षक आराम करताना दिसून आले. झाडेझुडपांच्या सावलीत मुलींनी डबे खाल्ले, महिला खेळाडूंनी कुठेतरी आडोशाला जाऊन चेंज केले. खेळाडूंची गैरसोय होत असल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. क्रीडा स्पर्धेसाठी पैसे भरून सुद्धा सोईसुविधा पुरविल्या जात नाही, अशी ओरड शिक्षक करीत होते.