आरटीओत मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’

By admin | Published: February 7, 2017 02:03 AM2017-02-07T02:03:23+5:302017-02-07T02:03:23+5:30

राज्यात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे.

'Drought of Manpower' in RTO | आरटीओत मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’

आरटीओत मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’

Next

राज्यात ७९७ पदे रिक्त : नागपूर शहर व ग्रामीण प्रादेशिक कार्यालयांना १६० पदांची प्रतीक्षा
नागपूर : राज्यात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्त पदे भरली जात नसल्याने कामाची गती मंदावली आहे. याचा फटका कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना बसत आहे. सध्याच्या स्थितीत राज्यात २६०५ पदे मंजूर असून यातील ७९७ पदे रिक्त आहेत. तर नागपूर शहर व ग्रामीण प्रादेशिक कार्यालयामध्ये १०६ पदे रिक्त आहेत.
विशेष म्हणजे, नागपूर शहर आरटीओ कार्यालयांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून प्रादेशिक परिवहन अधिकारी तर ११ महिन्यांपासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद रिकामे आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर कार्यालयाचे कामकाज सुरू आहे.
राज्यात ५० आरटीओ कार्यालयांतर्गत ‘अ’ गटाची ४१० पदे मंजूर आहेत. यातील ३४४ पदे भरण्यात आली असून ६६ पदे रिक्त आहेत. ‘ब’ गटात २६४ पदे मंजूर असून १५८ पदे भरली आहेत. यातील १०६ पदे रिक्त आहेत. ‘क’ गटात १६५४ पदे मंजूर असून ४८० पदे रिक्त आहेत. यामुळे प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. यातच कार्यालयात सोयी नसल्याने प्रलंबित कामांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)

ग्रामीण प्रादेशिक कार्यालयात १०४ पदे रिक्त
नागपूर ग्रामीण आरटीओ प्रादेशिक कार्यालयांतर्गत नागपूर ग्रामीण, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा हे पाच आरटीओ कार्यालये येतात. या कार्यालयांतर्गत रोज सुमारे ३०० नवीन वाहनांची नोंद होते. यातील सर्वाधिक वाहनांची नोंद नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात होते. परिणामी, आरटीओच्या कामाचा प्रचंड व्याप वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत कर्मचारी व अधिकारी अल्प आहेत. अनेक वर्षांत रिक्त झालेली कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आलेली नाहीत. सध्याच्या स्थितीत या प्रादेशिक कार्यालयात वर्ग ‘अ’ ते ‘ड’ पर्यंतची २६८ पदे मंजूर असताना १०४ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.

शहर प्रादेशिक कार्यालयात १२२ पदेच भरलेली
नागपूर शहर प्रादेशिक कार्यालयांतर्गत नागपूर शहर व वर्धा आरटीओ आणि पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येते. हे तिन्ही कार्यालये मिळून गट ‘अ’ ते ‘क’ची १७८ पदे मंजूर असताना १२२ पदेच भरण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ५६ पदे रिक्त आहेत.

Web Title: 'Drought of Manpower' in RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.