नागपूर विभागातील १७०० गावात दुष्काळी परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:09 AM2020-01-07T00:09:36+5:302020-01-07T00:10:27+5:30
नागपूर विभागातील १७१६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने, येथे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांची पैसेवारी कमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे पिकांचे चांगले उत्पादन झाल्याच्या सुरुवातीच्या अहवालावर परतीच्या पावसाने पाणी फेरले. पूर व अतिवृष्टीचा फटका पिकांना बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर झाला. नागपूर विभागातील १७१६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने, येथे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांची पैसेवारी कमी आहे.
यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुरुवातीपासून चिंतित होता, नंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी सुखावला होता. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता यंदा उत्पादन चांगले होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. नजरअंदाज आणि सुधारित पैसेवारीत नागपूर विभागातील सर्वच गावांची पीक परिस्थिती उत्तम दर्शविण्यात आली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीही झाली. यामुळे पिकांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक गेले. यावर आता महसूल प्रशासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नागपूर विभागात ८,४४२ गावांमध्ये खरीप पीक घेतल्या जाते. यातील १७६८ गावांची अंतिम पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे, तर ६,४५२ गावांची पैसेवारी ही ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ३४३ तर गडचिरोली जिल्ह्यातील १९४ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. भंडारा, गोंदिया व चंद्रपूर येथील सर्वच गावाची पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे.