नागपूर ग्रामीण तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:39 PM2020-11-10T12:39:36+5:302020-11-10T12:40:19+5:30
Nagpur News नागपूर ग्रामीण तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यातील गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर, अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. असे असताना दुसरीकडे जिल्हातील पीक परिस्थिती उत्तम दाखविण्यात आली आहे. नागपूर ग्रामीण तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यातील गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली.
पीक परिस्थितीची माहिती करण्याकरिता पैसेवारीचा आधार घेण्यात येतो. तीनदा ही पैसेवारी जाहीर करण्यात येते. नजरअंदाज पैसेवारीनंतर आता सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील फक्त नागपूर ग्रामीण तालुक्यात पीक परिस्थिती चांगली नाही. येथील १४८ गावांमधील पैसेवारी ५० पेक्षा कमी दर्शविण्यात आली, तर काटोल तालुक्यातील फक्त एका गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात १,८४४ गावांमध्ये खरीपाचे पीक घेण्यात येते. यातील १,७८९ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली, तर १६४ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही.
सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यातील एकही गाव नाही
विशेष म्हणजे जिल्ह्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतपिकांनी मोठ्या प्रमाणात फटका बसला. सर्वाधिक फटका रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड आणि भिवापूर या पाच तालुक्यांना बसला. स्वतः शासन, प्रशासनाने ही बाब मान्य केली. नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक येऊन गेले. त्यांनीही नुकसान मान्य केले. शासनानेही नुकसानीकरिता मदत जाहीर केली आहे. परंतु पैसेवारी निश्चित करताना गावांची पीकस्थिती उत्तम दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.