लुडोच्या नादात बुडाला अन् रेल्वे पोलिसांच्या बेड्यात अडकला

By नरेश डोंगरे | Published: September 22, 2023 09:51 PM2023-09-22T21:51:45+5:302023-09-22T21:52:50+5:30

ऑनलाईन गेमिंगने ढकलले कर्जाच्या दलदलीत

Drowned in the sound of Ludo and caught in the hands of the railway police | लुडोच्या नादात बुडाला अन् रेल्वे पोलिसांच्या बेड्यात अडकला

लुडोच्या नादात बुडाला अन् रेल्वे पोलिसांच्या बेड्यात अडकला

googlenewsNext

नागपूर : एक अत्यंत महत्वाकांक्षी तरुण चांगला शिकतो, नंतर सायबर कॅफे टाकून चांगला व्यवसायही करतो अन् पैसा हातात खेळू लागताच त्याला झटपट श्रीमंत होण्याची घाई होते. त्यातून तो ऑनलाईन जुगाराच्या व्यसनात आकंठ बुडतो अन् कर्जाच्या दलदलीत फसतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी तो सायबर गुन्हेगारीकडे वळतो अन् नंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकतो. काहीशी रिलची (फिल्मी) वाटणारी ही स्टोरी रियल आहे. ती नुकतीच रेल्वे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाली आहे.

तरुणाचे नाव आहे करण. तो हिंगण्याजवळ राहतो. अवघ्या २६ वर्षांच्या करणला कॉलेजमध्ये शिकतानाच पैसा कमविण्याची ओढ लागली. त्यामुळे पदवी घेतल्यानंतर त्याने सायबर कॅफे टाकला. यातून त्याला चांगली कमाई होऊ लागली. मात्र, झटपट श्रीमंत होण्याची हाैस जडल्यामुळे तो लुडो (जुगार)कडे वळला. प्रारंभी लुडोत बऱ्यापैकी जिंकल्याने त्याने मोठमोठे डाव खेळणे सुरू केले अन् हरत गेला. त्याच्यावर कर्जाचा डोंगर चढला. कर्जाच्या दलदलीतून बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नसल्याने त्याने गुन्हेगारीच्या वाटेवर पाय ठेवला. त्याने स्मार्ट फसवणूकीचा फंडा अवलंबिला. रेल्वे स्थानकावर जायचे. कन्फर्म तिकिटा काढून देतो, अशी गरजूंना बतावणी करायची. आपल्या मोबाईलवरून आयआरसीटीसीच्या अॅपच्या माध्यमातून तिकिटा काढायच्या. संबंधितांकडून त्याची रक्कम घ्यायची आणि नंतर त्या तिकिटा कॅन्सल करून तिकिटाची रक्कम परत (रिफंड) मिळवायची अन् गायब व्हायचे, असा गोरखधंदा त्याने सुरू केला.

दोन दिवसांपूर्वी त्याने असेच एकाला रेल्वे स्थानकाला हेरले. त्याला आपल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून १३ तिकिटा काढून दिल्या. दुसऱ्या एकाला दोन तिकिटा दिल्या. तिकिट दिल्यानंतर त्यांच्याकडून रक्कम घेतली. कन्फर्म तिकिटा मिळाल्याच्या आनंदात संबंधित व्यक्ती घरी गेल्या अन् त्यांना तिकिटा कॅन्सल करण्यात आल्याचा मेसेज मिळाला. त्यामुळे त्यांनी करणला फोन केला. यावेळी करणने कसले तिकिट कोणते तिकिट, अशी विचारणा करत त्या दोघांना झिडकारले. तो बऱ्या बोलाने ऐकत नसल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली.
 

सीसीटीव्हीने केली चुगली

पोलिसांनी करणच्या मोबाईलवरून त्याचा माग काढला. मात्र, ताब्यात घेतल्यानंतर तो गुन्हा मान्य करायला तयार नव्हता. 'मी तो नव्हेच'ची त्याची भाषा होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कानाखाली आवाज काढला. त्याला फिर्यादी सोबत व्यवहार करतानाचे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीचे फुटेज दाखविले. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर ठाणेदार मनीषा काशिद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करणला अटक करून कोठडीत डांबले.

म्हणे कर्जबाजारीपणाला कंटाळलो

उच्चशिक्षित असलेल्या करणला पोलिसांनी गुन्हेगारीकडे कसा वळला, याबाबत चाैकशी केली असता त्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून हा मार्ग अवलंबिल्याचे सांगितले.

Web Title: Drowned in the sound of Ludo and caught in the hands of the railway police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.