ड्रग्ज-दारूचा नाद, १४९ जणांनी स्वत:लाच केले ‘खल्लास’

By योगेश पांडे | Published: December 14, 2023 12:09 AM2023-12-14T00:09:40+5:302023-12-14T00:09:57+5:30

नागपूरकरांना जीवघेणा ‘स्ट्रेस’; वर्षभरात ७७१ आत्महत्या : राज्यात सर्वाधिक आत्महत्येचा दर उपराजधानीत.

drug alcohol 149 people committed life ends | ड्रग्ज-दारूचा नाद, १४९ जणांनी स्वत:लाच केले ‘खल्लास’

ड्रग्ज-दारूचा नाद, १४९ जणांनी स्वत:लाच केले ‘खल्लास’

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मागील काही काळापासून जीवनशैलीमध्ये बदल होत असल्याने ताणतणावदेखील वाढताना दिसून येत आहेत. अनेकजण तणावाची पातळी सहन न करू शकल्याने जीव देण्याचे टोकाचे पाऊलदेखील उचलतात. नागपूर हे तसे दिलखुलास लोकांचे शहर मानले जाते. मात्र येथील नागरिकांमध्येदेखील ‘स्ट्रेस’ वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. राज्यात मागील वर्षी झालेल्या आत्महत्यांमध्ये नागपुरातील दर सर्वाधिक होता. वर्षभरातच शहरातील ७७१ नागरिकांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी समाजमनाच्या विचार प्रणालीवरच झणझणीत अंजन टाकणारी आहे.

‘एनसीआरबी’ने देशातील आत्महत्यांची आकडेवारी जारी केली आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. २०२२ साली नागपुरात ७७१ जणांनी आत्महत्या केली व आत्महत्यांचा दर राज्यात सर्वाधिक ३०.८ इतका होता. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १३३ महिलांचा समावेश होता. मुंबईत १ हजार ५०१ आत्महत्या झाल्या व ८.२१ इतका आत्महत्यांचा दर होता, तर पुण्यात १ हजार ३ आत्महत्या झाल्या व त्यांचा दर १९.९ इतका होता. नाशिकमधील आत्महत्यांचा दर १६.९ इतका होता. देशपातळीवर नागपूरचा आत्महत्यांमध्ये आठवा क्रमांक होता.

या आकडेवारीतील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे एमडी व इतर ड्रग्जच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर तरुणाई फसत आहे. याच्या विळख्यात फसल्यावर जर ड्रग्ज मिळाले नाही तर हे तरुण अगदी टोकाचेदेखील पाऊल उचलायला मागेपुढे पाहत नाही. २०२२ मध्ये दारू किंवा ड्रग्जच्या नादी लागून तब्बल १४९ जणांनी आत्महत्या केली. एकूण आकडेवारीच्या तुलनेत ही टक्केवारी जवळपास २० टक्के इतकी आहे.

- दोन वर्षातील दर समानच

२०२१ मध्ये नागपुरात ७७७ नागरिकांनी आत्महत्या केली होती. त्या वर्षी कोरोनाचा फटका बसला होता व अनेकजण विविध तणावात आले होते. मात्र २०२२ मध्ये अशा प्रकारची कुठलीही स्थिती नव्हती. मात्र तेव्हाचा दरदेखील जवळपास सारखाच राहिला.

- प्रेमप्रकरणाचे वय धोक्याचे

प्रेमप्रकरणातून वर्षभरात ३५ जणांनी जीव दिला. यात २५ पुरुष, तर १० महिलांचा समावेश होता. अजाण वयात प्रेम झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारे ताणतणाव किंवा प्रेमात अपयश आल्यानंतर अनेकांनी हे पाऊल उचलले.

- अर्ध्याहून अधिक आत्महत्या घरातील वादांतून

शहरातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या या कुटुंबातील टोकाच्या वादांमधून झाल्याचे वास्तव आहे. ४३६ जणांनी घरातील भांडणातून जीव दिला. त्यात ३३५ पुरुष, तर १०१ महिलांचा समावेश होता. त्याखालोखाल आजारपणाला कंटाळून १०५ जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यात ९२ पुरुष व १३ महिलांचा समावेश होता. एक्स्ट्रा मॅरेटल अफेअरमुळे चारजणांनी आत्महत्या केली, तर घटस्फोटाच्या तणावातून ७ लोकांनी जीवन संपविले.

- कर्करोगाला कंटाळून ३३ जणांची आत्महत्या

विविध आजारपणाला कंटाळून शंभरहून अधिक जणांनी आत्महत्या केली. त्यातील ६ महिलांसह ३३ जण हे कर्करोगाने पीडित होते. एकीकडे लहान लहान मुले कर्करोगाशी झुंज देऊन त्यावर मात करत असताना व कर्करोगावर उपचार उपलब्ध असतानादेखील त्यांनी हे जीवघेणे पाऊल उचलले. अर्धांगवायूने ग्रस्त १३ जणांनी जीव दिला, तर मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ५८ जणांनी जीवन संपविले.

- आत्महत्येची प्रमुख कारणे

कारणे - आत्महत्या पुरुष : आत्महत्या महिला : एकूण
कर्ज - २ : १ : ३
विवाहाचा तणाव : १४ : ८ : २२
परीक्षेत अपयश : ४ : २ : ६
कौटुंबिक समस्या : ३३५ : १०१ : ४३६
आजारपण : ९२ : १३ : १०५
ड्रग्ज-दारू : १४९ : ० : १४९
जिवलगाचे निधन : २ : २ : ४
प्रतिष्ठा : १ : ० : १
आदर्श व्यक्तीचे निधन : १ : ० : १
लव्ह अफेअर्स : २५ : १० : २५
करिअरमधील समस्या : ७ : ० : ७
मालमत्तेचा वाद : २ : ० : २

Web Title: drug alcohol 149 people committed life ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.