अमली पदार्थ विक्रेती अश्विनी डेचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:08 AM2021-07-29T04:08:16+5:302021-07-29T04:08:16+5:30
नागपूर : एमडी, चरस अशा विविध घातक अमली पदार्थांची विक्री करणारी कुख्यात गुन्हेगार अश्विनी ऊर्फ आशमी ऊर्फ आशी सुरेश ...
नागपूर : एमडी, चरस अशा विविध घातक अमली पदार्थांची विक्री करणारी कुख्यात गुन्हेगार अश्विनी ऊर्फ आशमी ऊर्फ आशी सुरेश डे (वय २५) हिचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावला. न्या. पी. वाय. लाडेकर यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
अश्विनी दोन महिन्यांपासून गजाआड आहे. तिला गुन्हे शाखा पोलिसांनी २२ मे २०२१ रोजी अटक केली. खबऱ्याकडून एमडी व चरस तस्करीची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी १७ मे २०२१ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केट गेट परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी सलमान खान (रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्याकडे १३१ ग्रॅम एमडी व १३० ग्रॅम चरस आढळून आले. तो नेहमी नागपूरला येऊन अश्विनी व तिचा मित्र आबीद अंसारी यांना एमडी व चरस पुरवीत होता. त्यानंतर हे दोघे इतरांना ते अमली पदार्थ विकत होते. ते तीन वर्षांपासून भामटी येथे एकत्र राहून हा समाजविघातक धंदा करीत होते. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले.