व्यसनमुक्तीची राखी बांधून दिला व्यसनमुक्तीचा संदेश
By कमलेश वानखेडे | Published: August 30, 2023 02:36 PM2023-08-30T14:36:19+5:302023-08-30T14:38:35+5:30
तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी 'ड्रग्ज फ्री नागपूर संकल्पना'
नागपूर :रक्षाबंधनाच्या सणाला जिल्हा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा संघटक गौरव आळणे यांच्या वतीने व्यसनमुक्तीची राखी बांधून जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. यावेळी "ड्रग्ज फ्री नागपूर" बनविण्याकरिता व्यसनमुक्तीचा प्रचार - प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट मत किशोर भोयर यांनी व्यक्त केले.
शालेय विद्यार्थी आणि तरुण मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी उपाययोजनांची गरज असून नागपूर शहरात व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या पदार्थांची गैर मार्गाने विक्री करणाऱ्यावर कारवाई व्हावी, असे ड्रग्ज रॅकेट समाजातून हद्दपार झाले पाहिजे, असा मानस भोयर यांनी व्यक्त केला.
आगामी काळात नागपूरमध्ये "ड्रग्ज फ्री नागपूर " व "युथ अगेन्स ड्रग्स क्लब" अशा संकल्पना प्रत्येक शाळा, महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात राबवण्याची नितांत गरज आहे. व्यसनमुक्तीच्या प्रचार प्रसारकरीता नियोजन संदर्भात कार्यालयाला कळवावे. निश्चितच जिल्हा समाज कल्याण व्यसनमुक्तीच्या कार्यात शासकीय धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर आहे. नागपूरमधील अधिका अधिक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगितले पाहिजे.
सोबतच समाज कल्याण विभाग कार्यालयीन अधीक्षक प्रवीण मुंडे व निरीक्षक प्रतिभा सुखदेवे यांना सुद्धा व्यसनमुक्तीची राखी बांधण्यात आली.