औषधीद्रव्ये कायद्याचा औषध निर्यातीशी संबंध नाही
By admin | Published: October 20, 2016 03:12 AM2016-10-20T03:12:27+5:302016-10-20T03:12:27+5:30
औषधीद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने कायद्याचा औषध निर्यातीशी काहीही संबंध नाही हा औषध निर्यातदार कंपन्यांचा दावा
कंपन्यांचा दावा मंजूर : हायकोर्टातील प्रकरण निकाली
नागपूर : औषधीद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने कायद्याचा औषध निर्यातीशी काहीही संबंध नाही हा औषध निर्यातदार कंपन्यांचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात योग्य ठरला आहे. यामुळे संबंधित कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
निर्यातीची औषधे राज्य शासनाने औषधीद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत जप्त केली होती. या कारवाईविरुद्ध काळे इम्प्लेक्स, एन. एन. एजन्सीज, बालाजी सेल्स व ए. डी. फार्मास्युटिकल्स या कंपन्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंपन्यांचा दावा योग्य ठरल्यानंतर ही याचिका निकाली काढण्यात आली. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
याचिका प्रलंबित असताना उपमहासंचालक (आंतरराष्ट्रीय संबंध व जागतिक व्यवसाय) यांनी ५ जून २०१४ रोजी मुख्य पोस्टमास्तर जनरल यांना पत्र पाठविले. त्यात राज्य शासनाला आंतरराष्ट्रीय वस्तू जप्त करण्याचा अधिकार नसून ही बाब सीमाशुल्क विभागातील सहायक औषधीद्रव्ये नियंत्रकाच्या अख्त्यारित येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानेही औषधीद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने कायद्याचा निर्यातीशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शासनानेही ही बाब मान्य केली. राज्य शासनाला केवळ परवान्यासंदर्भातील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे, अॅड. एम. एम. अग्निहोत्री व अॅड. ए. के. सोमानी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)