जीवघेण्या 'ब्रेन ट्युमर'ला भेदणार औषधीयुक्त 'नॅनो पार्टिकल्स'

By आनंद डेकाटे | Updated: April 5, 2025 17:07 IST2025-04-05T17:05:45+5:302025-04-05T17:07:38+5:30

नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचेल औषध : विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधकांनी शोधली उपचाराची नवीन पद्धत

Drug-loaded 'nanoparticles' to penetrate deadly 'brain tumors' | जीवघेण्या 'ब्रेन ट्युमर'ला भेदणार औषधीयुक्त 'नॅनो पार्टिकल्स'

Drug-loaded 'nanoparticles' to penetrate deadly 'brain tumors'

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नाकाद्वारे दिलेले औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचत औषधीयुक्त 'नॅनो पार्टिकल्स' आता जीवघेण्या 'ब्रेन ट्युमर'ला भेदणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधकांनी कॅन्सर या जीवघेण्या आजारावर कोठेही शक्य होईल, अशी उपचाराची नवीन पद्धत शोधून काढली आहे. उपचाराच्या नवीन पद्धतीमुळे कॅन्सरने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विणा शैलेंद्र बेलगमवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागर त्रिवेदी यांनी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या 'इन्स्पायर फेलोशिप'मधून अत्यंत उपयोगी असलेले हे नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे. प्रचलित उपचार पद्धतीनुसार कॅन्सर रुग्णांना किमोथेरपी शिवाय पर्याय नाही. किमोथेरपीद्वारे औषधी रुग्णांना रक्तभिसरणाच्या माध्यमातून दिली जाते. या प्रचलित थेरपीमुळे रुग्णांच्या इतर अवयवावर विपरीत परिणाम होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे संशोधकांनी रक्ताला टाळत न्यूरान्सच्या माध्यमातून थेट मेंदूमध्ये औषध पोहोचेल अशी उपचाराची नवीन पद्धत संशोधनातून शोधून काढली आहे. 'नोवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम' असे या नवीन प्रकारच्या उपचार पद्धतीला नाव देण्यात आले आहे.

अशी आहे उपचार पद्धत
स्प्रेद्वारे नाकावाटे औषधीतील नॅनो पार्टिकल्स न्यूरान्सच्या माध्यमातून थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचेल. या नवीन उपचार पद्धतीत औषधी मेंदूतील गाठींपर्यंत पोहोचत असताना रक्ताचा अडथळा होणार नाही, याची दक्षता देखील घेण्यात आली आहे. शरीराच्या इतर भागापर्यंत औषध पोहोचणार नसल्याने अन्य अवयवांना इजा पोहोचण्याची शक्यता कमी होणार आहे. नवीन पद्धत ग्लायो ब्लास्टोमा मल्टीमार्म (जीबीएम)- ग्रेड ४ मधील ब्रेन ट्युमर झालेल्या रुग्णांवर देखील नवीन औषधोपचार पद्धत वापरता येणार आहे. अनेकदा रुग्णांना केमोथेरेपी अथवा प्रचलित पद्धतीनुसार औषधोपचार करण्यासाठी रुग्णालयात भरती व्हावे लागते. या नवीन पद्धतीनुसार रुग्णालयात अथवा कोठेही स्प्रेच्या माध्यमातून वैद्यकीय मार्गदर्शनाखाली औषधोपचार घेणे सुलभ होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ तसेच पैशाची बचत देखील होणार आहे.

संशोधनासाठी दोन पेटंट
'ब्रेन ट्युमर'वरील आजारासाठी शोधून काढलेल्या 'नोवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम' या नवीन प्रकारच्या उपचार पद्धतीसाठी औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. विणा बेलगमवार व डॉ. सागर त्रिवेदी यांना दोन पेटंट प्राप्त झाले आहे. या उपचार पद्धतीबाबत डॉ. सागर त्रिवेदी यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे १२ संशोधन पेपर तर ५ बुक चाप्टर प्रसिद्ध झाले आहे.

इटली येथे प्रेझेंटेशन
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने प्राप्त झालेल्या एसईआरबीमधून डॉ. सागर त्रिवेदी यांनी इटली येथील बोलोनिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाबाबत प्रेझेंटेशन सादर केले आहे.

Web Title: Drug-loaded 'nanoparticles' to penetrate deadly 'brain tumors'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर