नागपूर पोलीस खोदणार ड्रग्ज माफियाचे नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:00 AM2019-01-11T01:00:35+5:302019-01-11T01:01:21+5:30

गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांचे मध्य भारतातील नेटवर्क मजबूत करणारा ड्रग्जमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान (वय ४७) याची संपत्ती तसेच त्याच्या संपर्कातील ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, आबूचे नेटवर्क मजबूत करणाऱ्या तसेच त्याच्यासोबत नेहमीच इकडेतिकडे दिसणाऱ्या शहरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा तपास अधिकारी शोध लावणार काय, त्यांच्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न गुन्हेगारी वर्तुळासह खुद्द शहर पोलीस दलातही चर्चेला आला आहे.

Drug mafia network will dig the Nagpur Police | नागपूर पोलीस खोदणार ड्रग्ज माफियाचे नेटवर्क

नागपूर पोलीस खोदणार ड्रग्ज माफियाचे नेटवर्क

Next
ठळक मुद्देअनेकांना अटक होण्याची शक्यता : आबूच्या ‘पोलीस मित्रा’चे काय होणार, सर्वत्र उत्सुकता !

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांचे मध्य भारतातील नेटवर्क मजबूत करणारा ड्रग्जमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान (वय ४७) याची संपत्ती तसेच त्याच्या संपर्कातील ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, आबूचे नेटवर्क मजबूत करणाऱ्या तसेच त्याच्यासोबत नेहमीच इकडेतिकडे दिसणाऱ्या शहरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा तपास अधिकारी शोध लावणार काय, त्यांच्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न गुन्हेगारी वर्तुळासह खुद्द शहर पोलीस दलातही चर्चेला आला आहे.
विदर्भातील प्रमुख ड्रग्जमाफिया समजल्या जाणाऱ्या कुख्यात आबूला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी फिल्मीस्टाईल अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून, आबूची संपत्ती सील करण्याच्या हालचाली गुन्हे शाखेने सुरू केल्या आहेत. मोठा ताजबाग जवळच्या झोपडपट्टीत राहणारा आणि काही वर्षांपूर्वी लुनावर फिरणारा आबूकडे सध्या कोट्यवधींची संपत्ती आहे. चार ते पाच लाखांचे सोने त्याच्या नेहमीच अंगावर असते. लाखोंच्या आलिशान कार तसेच आलिशान बंगल्यात तो राहतो. आबूने साजीद तसेच अन्य काही मित्रांच्या माध्यमातून प्रारंभी बारमध्ये डान्स आणि गायन करणाºया तरुणींना ड्रग्जची लत लावली. त्यांच्या माध्यमातून अनेकांवर जाळे फेकून आबूने त्याची एक फौजच तयार केली. महाविद्यालयीन युवक-युवतींनाही त्याने प्रारंभी मित्रांच्या माध्यमातून मोफत एमडी पावडर देऊन नंतर त्यांनाही व्यसनाधीन केले. अशाप्रकारे तरुणाईसह अनेक धनिक मंडळींना नशेचे गुलाम बनवून आबूने कोट्यवधींची ठिकठिकाणी मालमत्ता जमविली आहे. त्याच्या बँकेतील खात्यात आणि लॉकरमध्येही मोठी संपत्ती मिळण्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
पगार सरकारचा, साथ आबूची !
आबूची संपत्ती, त्याचे साथीदार आबूच्या संपर्कातील ड्रग्ज माफिया आणि तस्करांना पोलीस निश्चितपणे शोधणार आहे. पुढच्या काही तासात त्यामुळे आरोपींची संख्या वाढू शकते. मात्र, पोलिसांची नोकरी, सरकारचे पगार घेऊन आबूची नेहमी साथ देणाऱ्या, त्याला वाचविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आबूच्या कॉल डिटेल्समध्ये ड्रग्ज माफियांसारखेच काही पोलीस कर्मचाऱ्यांचेही नियमित संपर्काचे पुरावे मिळू शकतात. तपास पथक त्याचे काय करणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: Drug mafia network will dig the Nagpur Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.