ड्रग माफियाशी संबंध : नागपुरात चार पीएसआयसह सहा निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:12 AM2019-02-06T00:12:46+5:302019-02-06T00:13:36+5:30
कुख्यात ड्रग माफिया आबू खानची साथ देणाऱ्या चार पोलीस उपनिरीक्षकासह सहा जणांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात ड्रग माफिया आबू खानची साथ देणाऱ्या चार पोलीस उपनिरीक्षकासह सहा जणांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
मध्य भारतातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया आबू याला दोन आठवड्यांपूर्वी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. तत्पूर्वी त्याच्या दोन साथीदारांना पकडून पोलिसांनी तीन लाखांचे एमडी पावडर हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा अमली पदार्थ जप्त केला होता. या दोघांच्या अटकेतूनच कुख्यात आबूच्या नेटवर्कचा खुलासा झाला. त्यानंतर पहिल्यांदाच आबूच्या मुसक्या बांधून त्याची गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशी केली. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कला शहरातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याचेही उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास केला असता हुडकेश्वर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश पुरभे, सक्करदऱ्यातील उपनिरीक्षक मनोज ओरके, तहसीलमधील शरद सिकने आणि साजीद मोवाल हे चार पोलीस उपनिरीक्षक ड्रग्ज माफिया आबूच्या सतत संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर पोलीस दलात प्रचंड वादग्रस्त अशी ओळख असलेला पोलीस कर्मचारी जयंता शेलोट आणि श्याम मिश्रा या दोघांचे आबूच्या मोबाईलमध्ये वारंवार कॉल्स आढळले. त्यामुळे हे वरिष्ठ पोलीस अधिकारीही हादरले. पोलीस दलात राहून, सरकारचा पगार घेऊन हे पोलीस अधिकारी-कर्मचारी आबूची चाकरी करीत असल्याचा अंदाज आल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी त्याची गंभीर दखल घेत नीलेश पुरभे, मनोज ओरके, शरद सिकने आणि साजीद मोवाल या चार पोलीस उपनिरीक्षकांच्या तसेच कर्मचारी जयंता शेलोट आणि श्याम मिश्राच्या निलंबनाचे आदेश रात्री जारी केले. उशिरा रात्री ही बातमी व्हायरल झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
जयंताचे ८०० कॉल्स
अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एमडीच्या नशेची लत लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात केवळ आबू आणि त्याचे गुन्हेगार साथीदारच नव्हे तर उपरोक्त पोलिसांचाही सहभाग असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या मंडळींपैकी पोलीस कर्मचारी जयंता शेलोटचे आबूच्या फोनवर चक्क ८०० कॉल्स आढळले.जयंताला यापूर्वीही अनेकदा निलंबित करण्यात आले आहे, हे विशेष!
निलंबित पोलीस नशेडी ?
उपरोक्त पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी हे ड्रग्ज माफिया आबूकडून प्रारंभी हप्ता म्हणून बक्कळ रक्कम घेत होते. मात्र नंतर आबूने त्यांना एमडी पावडरच्या नशेची लत लावली. त्यामुळे हे सहाही जण नशेडी बनल्याची चर्चा आहे. एमडी मिळावी म्हणून ते आबूच्या इशाºयावर काम करायचे, असेही बोलले जाते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या सहा जणांचा डिफॉल्ट रिपोर्ट आठवडाभरापूर्वी वरिष्ठांकडे पाठविला. बराच विचारविमर्श केल्यानंतर या नशेडी कर्मचाऱ्यांना पोलीस दलात ठेवून शहर पोलीस दलातील आणखी काही जणांना भ्रष्ट तसेच नशेडी बनविण्याऐवजी या सहा जणांना निलंबित करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला. या सर्वांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना बडतर्फ केले जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.