औषधांचा तुटवडा, टीबीचा धोका वाढला, सायक्लोसरीन औषधी संपल्या
By सुमेध वाघमार | Published: September 26, 2023 01:53 PM2023-09-26T13:53:10+5:302023-09-26T13:53:53+5:30
स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याचा सूचना
नागपूर : २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राला क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु मागील चार महिन्यांपासून क्षयरोग औषधांचा तुटवडा आहे. शासनाकडून या औषधांचा साठाच मिळालेला नाही. यामुळे आता स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्याची वेळ आली आहे.
क्षयरोग (टीबी) हा जगातील सर्वांत प्राणघातक संसर्गजन्य आजारांपैकी एक आहे. दररोज, जवळपास ४,१०० हून अधिक लोक क्षयरोगाने आपला जीव गमावतात. तर, जवळपास २८,००० लोक या टाळता येण्याजोग्या आणि बरे करण्यायोग्य रोगाला बळी पडतात. क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. क्षयरोगाचे जे रुग्ण व्यवस्थित औषधे (डॉट्स) घेत नाहीत किंवा अर्धवट घेतात त्यांना क्षयरोगाची पुढची पायरी ‘मल्टीड्रग रेझिस्टंन्ट ट्युबरक्युलॉसिस’ला (एमडीआर-टीबी) सामोरे जाण्याचा धोका असतो. असे असतानाही औषधांचा तुटवडा पडला आहे. नागपूर ग्रामीणमध्ये १,३९४ आणि शहरातील ९५ असे एकूण १,४९३ टीबीचे रुग्ण आहेत.
- सर्वच जिल्ह्यात तुटवडा
क्षयरोगाच्या रुग्णांना सायक्लोसरीन, लिनझोलिड क्लोफॅझिमिन, मोक्सीफ्लॉक्सासिन पायरीडॉक्सिन आणि डिलामिंड ही औषधे द्यावी लागतात. सध्या सायक्लोसरीन या औषधीचा साठाच संपला असल्याचे अधिकारी सांगतात. उर्वरित औषधींचा फारच कमी साठा आहे. यातील बहुसंख्य औषधी या ‘एमडीआर-टीबी’च्या रुग्णांना दिल्या जातात. राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यात औषधांचा तुटवडा असल्याची माहिती आहे.
- ग्रामीण भागात महिनाभराचा साठा
ग्रामीण भागात जवळपास महिनाभराचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले म्हणाले, औषधी मिळत नसल्याच्या तक्रारी नाहीत. औषधांचा उपलब्धतेचा आढावा घेतला जात आहे.
- पुरवठादाराकडेही औषधी नाहीत
सुत्रानुसार, क्षयरोगाचा औषधी पुरविणाऱ्या पुरवठ्याकडेच औषधी उपलब्ध नाहीत. या औषधींचे उत्पादन होत आहे. परंतु ते रुग्णांपर्यंत पोहचण्यास उशीर होऊ शकतो.
- लवकरच औषधी उपलब्ध होतील
क्षयरोगाच्या औषधी स्थानिक पातळीवर खरेदी करण्याचा सूचना आहेत. त्यानुसार शहरातील रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो मंजूर होऊन पुरवठादारकडे गेला आहे. यामुळे लवकरच औषधी उपलब्ध होतील. नोव्हेंबर महिन्यापर्यंत स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्याच्या सूचना आहेत.
- डॉ. शिल्पा जिचकार, क्षयरोग अधिकारी शहर