यूपीचा ड्रग तस्कर सलमान खान नागपुरात गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:47+5:302021-05-19T04:08:47+5:30

कृत्रिम पायातून करत होता ड्रग्जची तस्करी : मुंबईतून आणली होती खेप : एमडी आणि चरस जप्त : एनडीपीएसची रेल्वेस्थानकाजवळ ...

UP drug smuggler Salman Khan arrested in Nagpur | यूपीचा ड्रग तस्कर सलमान खान नागपुरात गजाआड

यूपीचा ड्रग तस्कर सलमान खान नागपुरात गजाआड

Next

कृत्रिम पायातून करत होता ड्रग्जची तस्करी : मुंबईतून आणली होती खेप : एमडी आणि चरस जप्त : एनडीपीएसची रेल्वेस्थानकाजवळ नाट्यमय कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उत्तर प्रदेशातील ड्रग्ज तस्कर सलमान खान नादिर खान (वय २४) याच्या स्थानिक एनडीपीएसच्या पथकाने सोमवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या मुसक्या आवळल्या. दिव्यांग असलेला सलमान खान यूपीच्या फैजाबाद जिल्ह्यातील ऐहार रुदोली येथील रहिवासी आहे. तो एका पायाने दिव्यांग असून त्याच कृत्रिम पायातून तो अंमली पदार्थांची नागपूरसह देशातील विविध भागात तस्करी करीत होता.

पोलिसांनी पकडू नये म्हणून ड्रग तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या करतात. गिफ्ट बॉक्स, मेडिसीन बॉक्स, चॉकलेट, मसाल्याच्या पार्सलमधून एमडी तसेच इतर अंमली पदार्थांची तस्करी करतात. मुंबईतील मोठ्या ड्रग्ज पेडलर्ससाठी काम करणारा यूपीचा सलमान कृत्रिम पायातून ड्रग्जची तस्करी करत असल्याची आणि तो वेळोवेळी नागपुरात खेप देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी सलमानवर कारवाईसाठी एनडीपीएसचे पथक कामी लावले होते. त्यानुसार सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकाच्या एक्झिट गेट समोर, संत्रा मार्केट जवळ पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले. त्याचा कृत्रिम डावा पाय तपासल्यावर पोलिसांना चक्क त्यात १३ लाख, १० हजार रुपयांची १३० ग्राम एमडी आणि तेवड्याच वजनाची ३९ हजारांची चरस सापडली.

सलमान अनेक वर्षांपासून ड्रग तस्करीत सक्रिय असून तो मुंबई येथून घेतलेले ड्रग कृत्रिम पायात भरतो आणि वेगवेगळ्या मार्गाने नागपुरात येतो. स्थानिक तस्करांना तो एमडीची खेप पोचवतो. दोन महिन्यांत तो चार वेळा अशाच प्रकारे नागपुरात येऊन गेला आणि त्याने एमडी तसेच चरसची मोठी खेप येथील तस्करांना दिल्याचे पोलीस

चौकशीत उघड झाले आहे.

दिव्यांग असल्यामुळे त्याच्याकडे पोलिसांची नजर जात नव्हती. मात्र यावेळी त्याला पोलिसांनी जेरबंद केले.

---

वेगवेगळे मार्ग, वेगवेगळी साधने

सलमान मुंबई येथून घेतलेले ड्रग कृत्रिम पायात भरतो आणि वेगवेगळ्या मार्गाने कधी रेल्वे, कधी टॅक्सीने नागपुरात येतो. त्याला आज न्यायालयात हजर करून त्याची २३ मे पर्यंत पोलिस कोठडी मिळवण्यात आली.

---

विशेष मोहीम

अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात सोमवारी गुन्हे शाखेने विशेष धडक मोहीम राबविली. सोमवारी दुपारी ४ ते मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी तब्बल ८६ ठिकाणी छापे टाकून २१ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पोलिसांना काही ठिकाणी जुगार अड्डे, तर काही ठिकाणी शस्त्रही सापडले. ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जात आहे. सलमानच्या अटकेमुळे नागपूरसह ठिकठिकाणच्या ड्रग्ज तस्करांची नावेही उघड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे.

---

Web Title: UP drug smuggler Salman Khan arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.