ड्रग्ज तस्करांना झटका, २४ तासांत ५.२० लाखांची एमडी जप्त
By योगेश पांडे | Published: May 8, 2024 05:26 PM2024-05-08T17:26:12+5:302024-05-08T17:26:38+5:30
Nagpur : दुचाकीवरून तस्करी करणाऱ्या आणखी एका आरोपीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात एमडी तस्करीचे प्रमाण वाढले असून पोलिसांकडून कारवायादेखील वाढल्या आहे. २४ तासांत शहरात दोन ठिकाणी कारवाया करत पोलिसांनी तस्करांकडून ५.२० लाखांची एमडी पावडर जप्त केली. सक्करदरा व जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकांनी या कारवाया केल्या.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधात पथकाला जुना बिडीपेठ परिसरात एक दुचाकीस्वार एमडी पावडर घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ईकबाल शेख तय्यब शेख (४०, जुना बिडीपेठ) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत अगोदरदेखील तीन गुन्हे दाखल झाल्याने त्याची कसून झडती घेण्यात आली. त्याच्या ताब्यातून ५०.८१ ग्रॅम एमडी पावडर आढळली. तिची किंमत ५.०८ लाख रुपये इतकी होती. त्याच्या ताब्यातून पावडर व दुचाकी जप्त करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्याने ईस्तियाक खादीम (मोठा ताजबाग) व वसीम उर्फ गुड्डू (मोठा ताजबाग) यांच्या मदतीने एमडी पावडर मिळविल्याचे सांगितले. तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईकबालला सक्करदरा पोलीस ठाण्यातील पथकाच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, सिध्दार्थ पाटील, मनोज नेवारे, नितीन साळुंखे, रोहीत काळे, सुभाष गजभिये व अनुप यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
- दुचाकीवरून तस्करी करणाऱ्या आणखी एका आरोपीला अटक
दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंदोरा चौकात सापळा रचण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या सुधीर उर्फ चॅपल विलास गजभिये (३०, मायानगर, इंदोरा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ १.३६ ग्रॅम एमडी पावडर आढळली. पोलिसांनी पावडर, दुचाकी, मोबाईल जप्त केले. त्याच्याविरोधात जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.